यवतमाळ : सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, सायबर भामट्यांच्या जाळ्यात आजकाल कोणीही अलगद अडकत असल्याचे चित्र आहे. यासाठी सायबर भामटे नवनव्या क्लुप्त्या अवलंबित असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये उघडकीस आले आहे. यामुळे अशा भामट्यांपासून सावध होणे काळाची गरज आहे. अशाच एका प्रकरणामध्ये सायबर भामट्यांनी व्हिडीओ लाईक्स केल्यास रिवार्डसह बोनस देण्याचे आमिष एका तरुणाला दाखविले. आमिषाच्या लालसेपोटी तरुणाने दहा लाख ९५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, भामट्यांनी त्याची फसवणूक केली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रशांत गोपाल मिश्रा (३४, रा. बेले ले-आउट), असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अहमदाबाद येथील खासगी कंपनीत नोकरी करतो. २ नोव्हेंबर रोजी त्याला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. श्वेता राणा हिने व्हिडीओ क्रियेटर असल्याचे सांगितले. त्यात रोज नवीन टास्क दिले जाईल. व्हिडीओला प्रत्येक लाईकमागे ५० रुपये रिवार्ड व १५० रुपये बोनस मिळेल, असे आमिष त्याला दाखवण्यात आले. त्यानुसार तरुणाला तीन व्हिडीओची लिंक पाठवून लाईक्स करण्यास सांगण्यात आले. टेलिग्राम अॅप क्रमांकावरून प्रशांतची पूर्ण माहिती घेतली. बँकेच्या डिटेल्सवर १५० रुपये प्राप्त झाले. व्हीआयपी डेली टास्क दोनची लिंक पाठवून त्याला जॉईन करायला लावले. त्या ग्रुपचे २२ टास्क येतात, असे सांगितले गेले.
हेही वाचा – उपराजधानीत जानेवारी २०२४ मध्ये राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद; विशेषत: काय? जाणून घ्या…
३ नोव्हेंबर रोजी टास्क लिंक पाठवून स्क्रिन शॉट मागितले. काही रक्कम बँक खात्यात आली. त्यानंतर प्रीपेड टास्क व पैसे भरण्यास लावले. ७ नोव्हेंबरला ६० हजार रुपये मागितले. मिशन क्रमांक तीनसाठी अडीच लाख मागितले. ती रक्कम न दिल्यास भरलेले पैसे मिळणार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले. यामुळे प्रशांतने एका मित्राकडे पैसे मागून भरणा केला. मात्र, त्यानंतरही विविध कारणे सांगत पैशाची मागणी करण्यात आली. अशाप्रकारे रक्कम वाढत गेली. मिशन पूर्ण झाले. आता आपल्याला एकूण १४ लाख १३ हजार ८१२ रुपये कमिशनपोटी मिळेल, अशी आशा त्याला होती. मात्र, हे पैसे प्राप्त करण्यासाठी ३० टक्के टॅक्स म्हणजेच चार लाख २४ हजार १४४ रुपये भरावे लागतील. त्यानंतर १८ लाख ३७ हजार ९५६ रुपये मिळतील, असे त्याला सांगण्यात आले. अडकलेले पैसे परत मिळण्याच्या अपेक्षेने तरुण पैसे भरत गेला. यात तो कर्जबाजारी झाला.
हेही वाचा – वर्धा : रात्रीची तपासणी भोवली, मत्स्य अधिकाऱ्याचा बोट अपघातात मृत्यू
यवतमाळात आल्यावर त्याने घडलेला प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्यानंतर दहा नोव्हेंबरला सायबर सेलसोबत संपर्क साधला. त्यांनी लगेच आपल्या सिस्टिमला नोंद घेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी प्रशांतने शनिवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून श्वेता राणा हिच्यासह अन्य लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.