कुटुंबांतील संवाद वाढविण्यासाठी संघाकडून ‘प्रबोधन’
सणासुदीला पाश्चात्त्य धाटणीचे कपडे नकोत.. पुरुषांनी कुर्ता-पायजमा व महिलांनी साडी परिधान करावी, वाढदिवशी केक कापून मेणबत्त्या कसल्या विझवता; ती आपली संस्कृती नाही, घरी कुटुंबातील सगळे सदस्य मिळून गप्पा मारत असतील तर राजकारण, चित्रपट, क्रिकेट असले विषय वज्र्यच करणे उत्तम.. असे जनसामान्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हाती घेतली असून, कुटुंबांतील संवाद वाढविण्याचा उद्देश त्यामागे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
भारतीय संस्कृती व देशी मूल्ये देशवासीयांमध्ये रुजावीत, या हेतूने संघाने कुटुंब प्रबोधन नामक मोहीम हाती घेतली आहे. सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. नागपूर व इतर काही ठिकाणी या मोहिमेला अनुसरून संघाचे स्वयंसेवक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे आहार-विहाराबाबत प्रबोधन करीत आहेत.
‘सध्या सुकाळ झालेल्या दूरचित्रवाणी वाहिन्या, समाजमाध्यमे यांद्वारे विदेशी संस्कृतीचा प्रसार फार वेगाने होत आहे. मात्र त्याच्या आहारी न जाता आपल्या देशी मूल्यांचा अंगीकार सगळ्यांनी करावा’, अशी भूमिका स्वयंसेवक मांडत आहेत. ‘सणांच्या दिवशी पुरुषांनी छानपैकी कुर्ता-पायजमा हा भारतीय पेहराव परिधान करावा आणि महिलांनी साडी नेसावी,’ असे त्यांचे प्रबोधन सांगते. ‘केक कापून, त्यावरील मेणबत्त्या फुंकरून विझवणे ही वाढदिवस साजरी करण्याची तद्दन पाश्चात्त्य संस्कृती झाली. या पद्धतीस आपण थारा देता कामा नये,’ असे आर्जवही स्वयंसेवक करीत आहेत.
‘हल्लीच्या व्यग्र दिनक्रमामुळे कुटुंबांतील सदस्य एकमेकांना निवांत भेटतच नाहीत. त्यामुळे आठवडय़ातील किमान एक दिवस तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून गप्पा माराव्यात, एखाद्या विषयावर चर्चा करावी. मात्र या गप्पांमध्ये राजकारण, चित्रपट, क्रिकेट असल्या विषयांना स्थान देऊ नये. हे विषय सोडून इतर विषयांवर मनमोकळ्या गप्पा माराव्यात. या वेळी दूरचित्रवाणी संच बंद ठेवावा,’ असेही प्रबोधनात सांगितले जात आहे.
नागपुरात हा उपक्रम सध्या राबविला जात आहे. मुस्लिम, तसेच ख्रिश्चनधर्मीय कुटुंबांचेही प्रबोधन करण्याचा संघाचा हेतू आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत दर वर्षी हा विषय चर्चेला येतो. त्याचा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातो हे येथे उल्लेखनीय.
‘प्रबोधन’ प्रकाश
- सणासुदीला महिलांनी साडी आणि पुरुषांनी कुर्ता-पायजमा परिधान करावा.
- वाढदिवशी मेणबत्त्या विझवून केक कापू नये. विदेशी संस्कृतीच्या आहारी न जाता शाकाहाराचा अवलंब करावा.
- कौटुंबिक गप्पांमधून राजकारण, क्रिकेट, चित्रपट हे विषय वज्र्य करावेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ‘कुटुंब प्रबोधन’ या उपक्रमात कुटुंबाशी संवाद वाढविण्यासोबत त्यांना भारतीय संस्कृ तीची ओळख करून देणे हा उद्देश आहे.
– रवींद्र जोशी, सहसंयोजक, ‘कुटुंब प्रबोधन’