चंद्रपूर : मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे आयुर्वेदिक उपचारासाठी जात असलेल्या ब्रम्हपुरी येथील बडोले कुटुंबाचा अपघात झाला. त्यात एकाच कुटुंबातील तीनजणांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना १६ एप्रिल रोजी घडली.
ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले कुटुंबीयासह रविवार १६ एप्रिल रोजी स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापूर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की झालेल्या भीषण अपघातात वाहकचालक विजय गणपत बडोले (५८) हे गंभीर जखमी झाले. तर त्यांची पत्नी कुंदा बडोले (५२) मुलगा गिरीश बडोले (३२) व विवाहित मुलगी मोनाली चौधरी (बडोले) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक सेवानिवृत्त विजय बडोले, सून बबिता बडोले आणि दोन लहान चिमुकले नातवंड गंभीर जखमी झाले.
हेही वाचा – नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून भाजपाने केले मैदान शुद्ध!
वाहनांमध्ये एकाच परिवारातील एकूण सहाजण प्रवास करीत होते. गंभीर जखमीना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले. रविवारी रात्री ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, जखमी विजय बडोले यांचा आज सोमवार १७ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.