तणसाच्या ढिगावरील चारा बैल खात असल्याच्या किरकोळ कारणावरून पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथील वृद्धाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह चक्क आरोपींच्या घरासमोर नेवून आरोपींना तात्काळ फाशी द्या किंवा तसे लेखी आश्वासन द्या म्हणत ठिय्या मांडला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी कुटुंबीयांची समजूत काढून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल, पोलीस पाटील पद रद्द करण्यात येईल तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला व आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले गेले.
हेही वाचा >>> नागपूर : बाऊन्सर्सच्या गुंडागर्दीचा ‘व्हिडिओ व्हायरल’; पबमधील युवकाला जबर मारहाण, उपराजधानीत खळबळ
४ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपींनी किसान लिंगाजी कुमरे यास मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांनी चक्क मृतदेह आरोपींच्या घरी नेवून त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. मृतदेह आरोपींच्या घरासमोर ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस व दंगा नियंत्रण पथक तैनात केले होते. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी केशव गेलकीवार (५५), दामोदर गेलकीवार (४०),अक्षय गेलकीवार (३०), शुभम गेलकीवार (२३), तुळशीदास गेलकीवार (२०) रा. सर्व बोर्डा दीक्षित यांना त्वरित अटक केली आहे. तर, कल्पना केशव गेलकीवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री ८ वाजता अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी बोर्डा दीक्षित गाव गाठून कुटुंबीयांची समजूत काढत हे प्रकरण जलदगती न्यायालयात सादर करू, पोलीस पाटील यांचे पद हटवू, कुटुंबीयांना आर्थिक मदत व तपास आयपीएस अधिकाऱ्यांकडे देऊ, असे लेखी आश्वासन दिल्याने कुटुंबीयांनी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेत घरी नेला. गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला.