वर्धा : निराधार झालेल्या मृत मजुराच्या कुटुंबीयांनी माणूसकी पाहून भारावलेल्या अंत:करणाने मृतदेहासह परतीचा प्रवास सुरू केला. हिंगणघाटलगत कवडघाट येथे रेल्वे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे कंत्राटदाराने राजस्थानमधून मजूर आणले होते. त्यापैकीच विजय शर्मा व फिरोज खान यांचा रविवारी रात्री पुलावरून कोसळल्याने मृत्यू झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी आणणाऱ्या कंत्राटदाराने नंतर पळ काढल्याने कुटुंबीय निराधार व हताश झाले होते. शवविच्छेदनासाठी द्यावे लागणारे पैसेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते. हे वृत्त लोकसत्ता ऑनलाईनला प्रकाशित होताच, सर्वप्रथम खासदार रामदास तडस यांनी त्याची दखल घेतली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यलयाशी संपर्क साधत त्यांनी योग्य ती मदत करण्याची सूचना केली.
रुग्णालयात उपस्थित समाजसेवी मंगेश भुते हे त्यावेळी आवश्यक त्या मदतीसाठी धावपळ करीत होते. त्याच दरम्यान नागपूर रेल्वेचे वरिष्ठ अभियंता वरुण यादव तसेच वरुण कुमार, चंद्रशेखर झेगेकार, गिरीश जंगले, प्रदीप चटप हे घटनास्थळी पोहोचले. अशा घटनेत त्वरित शासकीय मदत शक्य नसल्याने त्यांनी रेल्वे अधिकारी ‘व्हॉट्सॲप’ समूहावर मदतीचे आवाहन केले. तासाभरात एक लाख रुपये जमा झाले. ही मदत येईपर्यंत उपाशीपोटी विमनस्क अवस्थेत बसलेल्या मजुराच्या कुटुंबीयांना सेवाग्राम पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष ढुमणे यांनी प्रथम नाष्टा व नंतर जेवण देत माणूसकी जपली. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातल्या तालमपूर येथील हे कुटुंब आहे. मृत विजयची पत्नी राखी विजय शर्मा, मुलगा अमन (९) व मुलगी साईना (५) यांच्या गावी परत जाण्याची व्यवस्था म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी नागपुरातून रुग्णवाहिका बोलावली. सोबत एक कर्मचारी दिला. तसेच दोन दिवस पुरेल एवढे खाद्य व काही रोख रक्कम राखीकडे दिली.
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”
रोजगार नाही म्हणून वाटेल त्या मजुरीसाठी गाव सोडून देशात कुठेही फिरण्याची तयारी ठेवणारा हा वर्ग. त्यातच असे संकट त्यांच्यावर कोसळले. आयुष्यभराचे संकट असतानाच आता मृतदेहाचे सोपस्कार कसे, हा प्रश्न होताच. मात्र पोलीस, समाजसेवी तसेच रेल्वे प्रशासनाने केलेली मदत या कुटुंबासाठी आभाळमायाच ठरली. मदत स्वीकारताना राखी शर्मा यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि ओठातून शब्द फुटत नव्हते. अन्य मदतीसोबतच मृताच्या दोन्ही कुटुंबीयास प्रत्येकी २५ हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले.