वर्धा : लोकसभा निवडणूक आता तापायला लागली. कोणतीही निवडणूक म्हटली की उमेदवाराचे आप्त, सगेसोयरे कामाला धावून येतात. अपेक्षित ती मदत करतात. मात्र हेच आप्त ऐन निवडणुकीत जर उमेदवारासाठी डोकेदुखी ठरत असतील किंवा अवघड जागेचे दुखणे ठरणार असतील तर मग उमेदवारास नुसता ताप ठरणार. वर्धा लोकसभा मतदारसंघात असेच दिसून आले.
रिंगणातील दोन प्रमुख उमेदवार म्हणजे भाजपचे रामदास तडस व आघाडीचे अमर काळे हे होत. तर बघू यांचे आप्त. भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांचे सासरे म्हणजे मोर्शीचे काँग्रेसचे माजी आमदार नरेश ठाकरे हे होत. मोर्शी हे वर्धा क्षेत्रात येत असल्याने ठाकरे यांचा प्रभाव उपयुक्त ठरू शकतो म्हणून स्वपक्षीय असलेले आमदार भोयर यांना तडस यांनी गळ घातलीय की चला नं ठाकरेंकडे. थोडे भेटून घेऊ. पण पक्षासाठी काँग्रेसप्रेमी सासरेबुवांना साकडे कसे घालणार, असा प्रश्न भोयर यांना पडला. कारण ठाकरे यांचे नाव काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रारंभी चर्चेत राहले. वर्धा काँग्रेस साठीच सोडा, मित्रपक्षांस देवू नका, असा आग्रह त्यांनी दिल्लीत धरला होता. त्यामुळे कडव्या काँग्रेसनिष्ठ सासरेबुवांकडे तडस यांच्यासाठी शब्द टाकण्याची बाब डॉ. भोयर यांनी हसण्यावारी नेली. प्रकरण थांबले.
हेही वाचा – नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
आता स्वतः सासरे असणारे रामदास तडस हे सून पूजा तडस हिने घेतलेल्या पत्रकार परिषदेने चक्रवून गेले. सुनेने अन्याय होत असल्याचा पाढा वाचला. पण तडस यांनी हे विरोधकांचे करस्थान असल्याचे स्पष्ट करीत प्रकरण कोर्टात असल्याचे नमूद केले. प्रकरण चर्चेत यासाठी आले कारण सुनेने या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. तो वैध पण ठरला. त्यामुळे सून सासरे यांच्यातील दुराव्याचे नाते चर्चेत आले. आघाडीचे अमर काळे यांना मात्र नात्याचा दिलासाच मिळाला.
माजी मंत्री अनिल देशमुख हे त्यांचे मामा. अमर यांची आई दिव. अनुराधाताई काळे यांचे अनिल देशमुख हे सख्खे बंधू. त्यामुळे त्यांची मदत अपेक्षित होतीच. सुरवातीला अमर काळे हे काँग्रेस की राष्ट्रवादी अश्या पेचात असताना ते सल्ला घेण्यासाठी मामाकडे गेले होते. तेव्हा मामाने तुझे तू ठरव, आता तू निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा पोक्त सल्ला दिला होता. मात्र नंतर घडामोडी वाढल्या व शरद पवार यांचे स्वारस्य दिसून आले तेव्हा मामांनी मोलाची कामगिरी बजावली, असे म्हणतात. आता तर ते ठिय्या मांडून बसले आहेत. कारण भाच्याच्या राजकीय आयुष्याचा प्रश्न तर. नियोजन नसल्याची तक्रार झाली तेव्हा मामा अनिल देशमुख यांनी समजावले की अरे अचानक लग्न जुळले असे समज. १५ दिवसांत तयारी करायची आहे.
हेही वाचा – नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
उमेदवारास थोडीच माहीत होतं की बोहल्यावर उभे रहावे लागणार म्हणून. अश्या खेळीमेळीत मामा हा प्रसंग सांभाळून भाच्याचा ताण दूर करीत आहे.