लोकसत्ता टीम

नागपूर : ‘कृपा करुन माझ्या फेसबुकवरील ‘मास्टर रेसिपी’ या अकाउंटवरील व्हिडीओला ‘क्लिक’ करु नका.’ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले. यावेळी त्यांनी चाहत्यांना अक्षरश: हात जोडून विनंती केली. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले.

प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांचे ‘मास्टर रेसिपी’ हे फेसबुक अकाऊंट हॅक करण्‍यात आले आहे. या हॅक केलेल्या अकाउंटच्या माध्यमातून दररोज अश्लिल व्हीडिओ पोस्‍ट केले जात आहेत. विष्‍णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्थापनाला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. मागील ३५ वर्षापासून पाककला क्षेत्रात विष्‍णू मनोहर कार्य करीत असून त्‍यांचे ‘मास्टर रेसिपी’ हे युट्यूब चॅनेल प्रसिद्ध आहे. विशेषकरुन त्यांच्या सबस्क्राईबर्समध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या चॅनेलवरून ते विविध मराठी पाककृतींचे व्हिडीओ पोस्‍ट करत असतात. याशिवाय, फेसबुकवर ‘मास्टर रेसिपी’ या चॅनेलचे पेज देखील असून त्याठिकाणी देखील ते रेसिपीचे व्हिडिओ पोस्‍ट केले जातात.

विष्‍णू मनोहर म्‍हणाले, विविध पदार्थ तयार करण्‍याचे कौशल्‍य दर्शकांना आत्‍मसात करता यावे तसेच, मराठी खाद्य संस्‍कृती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्‍ही ‘मास्टर रेसिपी’ चॅनेल सुरू केले. या माध्‍यमातून मराठी पदार्थांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, हा आमचा उद्देश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातून कुठलाही आर्थिक नफा नसतो. मात्र, कुणीतरी माझे फेसबुक अकाऊंट हॅक केले असून त्‍याद्वारे अश्लिल व्हिडीओ पोस्‍ट करत आहे. यापूर्वीदेखील मेक्सिकोतून पेज हॅक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा प्रकार संपला. आताही मेक्सिको वरुनच हे पेज हॅक झाले आहे. रेसिपी व्हिडिओचा क्लिक करताच अतिशय घाणेरडा व्हिडिओ समोर येत आहे.

एका सबस्क्रायबर्समुळे ही गोष्ट लक्षात आले. ज्यांना हॅकींगचा प्रकार माहिती आहे, त्यांनी काहीही म्हटले नाही. मात्र, काही लोक ‘तुम्हाला लाज वाटत नाही का, असे व्हिडिओ टाकायला’ या शब्दात शिव्या देत आहेत. या प्रकारामुळे मी जे काही इतक्या वर्षात कमावले होते, त्या प्रतिष्ठेला तडा गेला आहे. तब्बल एक लाखाने सबस्क्रायबर्स कमी झाले आहेत. इतक्या वर्षांची मेहनत पाण्यात गेली आहे. त्यामुळे ‘मास्टर रेसिपी’ मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओवर क्लिक करु नका. अन्यथा तुमचेही अकाउंट हॅक होऊ शकते. याउलट तुम्ही त्याठिकाणी तक्रार नोंदवू शकता. वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलीस, सायबर यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. अमेरिकेत देखील फेसबुकच्या कार्यालयात याबाबत तक्रार नोंदवली असल्याचे विष्णू मनोहर यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader