नागपूर : जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ जुलै रोजी ७५ प्रकारच्या तांदळापासून भाताचे ७५ प्रकार तयार करणार आहेत. विशेष म्हणजे, विविध राज्यातील ७५ शेतकऱ्यांकडून हा तांदूळ आणला जाणार आहे.

भारतात कोणत्याही प्रांतात भात हे प्रमुख अन्न म्हणून आढळते. भात ज्या धान्यापासून केला जातो त्या तांदळाची प्रांतानुसार नानाविध रूपे पहायला मिळतात. ठेंगण्या-ठुसक्या गावठी तांदळापासून ते बारीक सडसडीत बासमतीपर्यंत, तर सुवासिक आंबे मोहरापासून पोषण मूल्यांच्या बाबतीत वरचढ असणाऱ्या हातसडीच्या तांदळापर्यंत अनेक प्रकार असतात. या अशा वेगवेगळ्या तांदळापासून भाताचे विविध ७५ प्रकार तयार केले जाणार आहेत.

बजाज नगरातील विष्णूंच्या रसोईमध्ये हा आगळावेगळा उपक्रम होणार आहे. प्रत्येक भात ५ किलोंचा असेल. म्हणजेच एकूण ३७५ किलोचा भात यावेळी तयार होईल. हा भात सर्व खवय्यांसाठी नि:शुल्क वितरित केला जाणार आहे. भाताचा काही वाटा विशिष्ट मुलांच्या शाळेत, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अंधविद्यालय या ठिकाणी वितरित केला जाणार आहे.

खरे तर ७५ प्रकारचे तांदळाचे वाण गोळा करणे सोपे नाही मात्र, त्यासाठी लातूरचे दिनेश मित्तल यांचे सहकार्य मनोहर यांना लाभणार आहे. भाताचे पीक कसे लावतात याचे प्रात्याक्षिक यावेळी काही शेतकरी दाखवणार असून त्यातील काहींचा या उपक्रमात सत्कार केला जाणार आहे.

Story img Loader