लोकसत्ता टीम

नागपूर : ‘कृपा करुन माझ्या फेसबुकवरील ‘मास्टर रेसिपी’ या अकाउंटवरील व्हिडीओला ‘क्लिक’ करु नका.’ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले होते. ते अक्षरशः प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसमोर ढसाढसा रडले. कारण त्यांचे ‘मास्टर रेसिपी’ हे फेसबुक अकाऊंट हॅक करण्‍यात आले आहे. या हॅक केलेल्या अकाउंटच्या माध्यमातून दररोज अश्लिल व्हीडिओ पोस्‍ट केले जात होते. मात्र, त्यांचे हे फेसबुक पेज त्यांच्या मूळ रुपात त्यांना परत मिळाले आहे.

विष्‍णू मनोहर यांनी सायबर क्राईम विभागाकडे तसेच फेसबुक व्यवस्थापनाला यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सोमवारी विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. मागील ३५ वर्षापासून पाककला क्षेत्रात विष्‍णू मनोहर कार्य करीत असून त्‍यांचे ‘मास्टर रेसिपी’ हे युट्यूब चॅनेल प्रसिद्ध आहे. विशेषकरुन त्यांच्या सबस्क्राईबर्समध्ये महिलांची संख्या अधिक आहे. या चॅनेलवरून ते विविध मराठी पाककृतींचे व्हिडीओ पोस्‍ट करत असतात. याशिवाय, फेसबुकवर ‘मास्टर रेसिपी’ या चॅनेलचे पेज देखील असून त्याठिकाणी देखील ते रेसिपीचे व्हिडिओ पोस्‍ट केले जातात.

विविध पदार्थ तयार करण्‍याचे कौशल्‍य दर्शकांना आत्‍मसात करता यावे तसेच, मराठी खाद्य संस्‍कृती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आम्‍ही ‘मास्टर रेसिपी’ चॅनेल सुरू केले. या माध्‍यमातून मराठी पदार्थांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, हा आमचा उद्देश आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातून कुठलाही आर्थिक नफा नसतो. मात्र, कुणीतरी माझे फेसबुक अकाऊंट हॅक करत त्‍याद्वारे अश्लिल व्हिडीओ पोस्‍ट केले. यापूर्वीदेखील मेक्सिकोतून पेज हॅक झाले होते. त्यानंतर हा प्रकार संपला. आताही मेक्सिको वरुनच हे पेज हॅक झाले.

सबस्क्रायबर्समुळे ही गोष्ट लक्षात आली. काही जणांनी ही बाब समजून घेतली, तर काहींनी त्यांना शिव्या घातल्या. या प्रकारामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला. तब्बल एक लाखाने सबस्क्रायबर्स कमी झाले. वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलीस, सायबर यांच्याकडे तक्रार नोंदवली. अमेरिकेत देखील फेसबुकच्या कार्यालयात याबाबत तक्रार नोंदवली असल्याचे विष्णू मनोहर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, या घटनेला जवळजवळ महिना होत असतांना त्यांचे हे मास्टर रेसिपी पेज त्यांना परत मिळाले आहे.

“तुमच्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद! आमचे मास्टर रेसिपी पेज यशस्वीरित्या पुनर्संचयित झाले आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. यामध्ये माध्यमांच्या सहकार्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आम्ही खरोखर त्याचे आभारी आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद!”