नागपूर : क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलचे सामने विशेष पर्वणी असते. विविध देशातील आंतरराष्ट्रीय खेळांडूना एकत्रितपणे खेळताना बघण्याची ही सुवर्णसंधी असते. याच कारणामुळे आयपीएलची चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ असते. मात्र आयपीएलचे सामने काही निवडक शहरांमध्येच होत असल्याने क्रिकेटप्रेमी प्रत्यक्षपणे याचा आनंद घेण्यापासून मुकतात.
भारतातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला स्टेडियमप्रमाणेच आयपीएलचे सामने बघता यावे यासाठी फॅन पार्कचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा १२ आणि १३ एप्रिल रोजी नागपूरमध्ये होणार असून शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी ही विशेष पर्वणी राहणार आहे.
काय आहे फॅन पार्क ?
आयपीएल फॅन पार्क ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजकांनी सुरु केलेली एक अभिनव संकल्पना आहे, ज्याचा उद्देश देशभरातील क्रिकेटप्रेमींना स्टेडियमसारखा अनुभव देणे हा आहे. ही संकल्पना २०१५ साली सुरु झाली आणि दरवर्षी आयपीएलच्या हंगामात भारतातील विविध शहरांमध्ये अशा फॅन पार्कचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे ही फॅन पार्क त्या शहरांमध्ये भरवली जातात जिथे प्रत्यक्ष आयपीएल सामने होत नाहीत, त्यामुळे लहान आणि मध्यम शहरांतील चाहत्यांनाही सामन्याचा थेट आनंद घेता येतो.
फॅन पार्कमध्ये प्रेक्षकांसाठी मोठ्या स्क्रीनवर थेट सामना दाखवण्यात येतो. स्टेडियमसारखी उत्साही गर्दी, संगीत आणि जल्लोष यामुळे एक वेगळाच अनुभव मिळतो. यासोबतच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सेल्फी झोन, विविध खेळ आणि बक्षीसस्पर्धा अशा गोष्टी देखील आयोजित केल्या जातात. या फॅन पार्कमध्ये प्रवेश विनामूल्य असतो, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात.
कुठे आनंद घेता येणार? शहरात १२ आणि १३ एप्रिल रोजी फॅन पार्कचे आयोजन होणार आहे. आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने आहेत. सायंकाळी ४ वाजता पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघात खेळविला जाईल. रात्री ८ वाजता पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये रविवारीही दोन सामने आहेत. यात पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलोर तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळविला जाईल.
याप्रकारे नागपूरकरांना आयपीएलच्या चार सामन्यांचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. आयपीएल फॅन पार्कचे आयोजन मेकोसाबाग मैदानावर होणार आहे. शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून फॅन पार्कमध्ये क्रिकेट चाहते मोफत प्रवेश करू शकतील. फॅन पार्कच्या माध्यमातून अगदी मैदानासारख्या वातावरणात सामना बघण्याच्या संधीचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.