चंद्रपूर : विधानसभा निवडणूक आता कुठे आटोपली आहे. मतमोजणीला अजून काही तासांचा उशीर आहे. निकालासाठीही शनिवारच्या संध्याकाळपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परंतु, उत्साही चाहते व कार्यकर्त्यांनी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाचे फलक चंद्रपूर शहरात लावले आहेत. अभिनंदनाचा हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले.

मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे. मात्र उत्साही कार्यकर्त्यांना निकालाची प्रतीक्षा करायलाही वेळ नाही. त्यामुळे उत्साही चाहते व कार्यकर्त्यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाचे फलक शहरात ठिकठिकाणी आजपासूनच लावायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा…थेट अमित शहांकडून पुर्नवसनाचा शब्द मिळूनही माजी आमदाराचा सन्यास…म्हणाले, काय भरवसा?…

मुनगंटीवार यांच्या निवासस्थानासमोर देखील योगेश भागवत या उत्साही कार्यकर्त्याने कर्तृत्व आणि नेतृत्व सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे फलक लावले आहेत. या फलकाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. निवडणूक निकालाला एक दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अशा प्रकारे अभिनंदनाचे फलक लागत असल्याने मुनगंटीवार समर्थक उत्साहात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुनगंटीवार विजयी होतील असा विश्वास त्यांच्यात दिसत आहे.