चंद्रपूर : शेतीची कामे आटोपून बैलगाडीने घरी परत येत असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्याने बैलगाडी तलावात नेली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह शेतकरी तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथे सोमवारी उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्यासह दोन बैलांचा दुर्दैवी अंत झाला.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
भास्कर बापूजी साळवे (वय ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवार १६ ऑक्टोबरला भास्कर साळवे शेतीची कामे आटोपून सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरी परत येत होते. दरम्यान, बैलांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी बैलगाडी थेट तलावात नेली. पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यासह दोन्ही बैल पाण्यात बुडाले. सायंकाळी उशिरार्यंत भास्कर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता तलावात मृत बैल व बैलगाडी दिसून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
हेही वाचा : गडचिरोली : आलापल्ली वन विभागाच्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी त्रस्त
पोलिसांनी बचाव पथकासह शोधमोहिम राबवून सोमवारी सकाळी शेतकऱ्याच्या मृतदेहासह दोन बैलांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढले. या घटनेमुळे धानापूर गावात शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडवर घरातील कर्ता पुरुष काळाने हिरावल्याने साळवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.