जिल्ह्यातील उमरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गजानन दगडू हरमकार (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मुलीचे लग्न तोंडावर असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील कांदा पीक गेले. बँकेचे कर्ज देखील डोक्यावर होते. त्यामुळे सततच्या विवंचनेला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा >>> बुलढाणा : मूक मोर्चातून काँग्रेसचा दडपशाहीविरुद्ध ‘आवाज’! हुतात्मा स्मारक परिसरात सत्याग्रहद्वारे निषेध
उमरा येथील गजानन हरमकार यांच्याकडे एक एकर शेती आहे. त्यांनी स्वत:च्या व पत्नीच्या नावाने बँकेतून कर्ज काढून शेतात पेरणी केली. उत्पादना घट झाली. शिवाय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे कातचे पीक गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यातच २२ मे रोजी मुलीचे लग्न आहे. कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न होता. या तणावातून ते दोन दिवसांपासून बेपत्ता झाले होते. गुरुवारी तलावात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.