भंडारा: शेताच्या धुऱ्यावरून पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ८ जुलै रोजी सकाळी ११ .३० वाजता लाखांदूर येथे घडली.
भैरुदास सुखदेव गोटेफोडे (४५) रां. लाखांदूर असे मृतकाचे नाव असून तो लाखांदूर येथील जय माता डी ट्रेडर्सचां मालकही होता. नित्याप्रमाणे सकाळीच उठून भैरुदास लाखांदूर जवळील अंतरगाव येथे असलेल्या त्यांच्या शेतावर गेला होता. आज सकाळी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतावरील धुऱ्यावरून चालत असताना अचानक पाय घसरून तो ६ फूट खोल असलेल्या शेततळ्यात पडले.
हेही वाचा… ‘सामान बेचो’ आंदोलन करीत हाताला काम नसलेल्यांनी केला निषेध
बाहेर निघता न आल्याने खोल पाण्यात बुडून भैरुदास गोटेफोडे याचा मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजले तरी मुलगा घरी न आल्याने घरचे लोक शेतावर गेले असता भैरूदास पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसला. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. मृतक भैरुदास हे लाखांदूर येथील नगर पंचायतीच्या माजी नगरसेविका रिता गोटेफोडे यांचे पती आहेत. त्यांच्या पाठीमागे दोन मुली व एक मुलगा असून बराच मोठा आप्तपरिवार आहे.