वर्धा : जिल्ह्यातील समुद्रपूर वन क्षेत्रात ताडगाव भागात एका शेतकऱ्याचा आज वाघाने फडशा पाडला. गोविंदा लहानू चौधरी (६२) गावालगत असलेल्या शेतात काम करीत होते. त्याच वेळी वाघाने हल्ला केला. त्यांना फरफटत दोनशे मीटर अंतरावर नेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बंडू वाघ व प्रदीप दडमाल यांनी प्रत्यक्ष बघितली. त्यांनी माहिती दिल्यावर वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. तेव्हा मृत शेतकऱ्याच्या मानेवर दाताचे घाव दिसून आले. सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांनी पंचनामा केला.
हेही वाचा >>> अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन मुलानेच केली आईची हत्या; लहान भावालाही संपविले
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार वारसदार पत्नी चंद्रकला गोविंदा चौधरी यांना तत्काळ १० लाख रुपयाचा धनादेश प्रथम देण्यात आला. आता या वाघाचा शोध घेण्यासाठी ‘कॅमेरा ट्रॅप’ लावण्यात आले आहे. तसेच गस्तीपथकाद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. या घटनेमुळे समुद्रपूर येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गावकरी संतप्त झाले आहे, तर वनरक्षक यांचे तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.