गोंदिया: महाराष्ट्राचे नाव हे शेतकरी आत्महत्यांवरून नावलौकिकास येत असल्याचे जाणवत आहे. राज्य मजबूत असताना सुद्धा अनेक बाबतीत मागे पडत असल्याचे आपण पाहतो आहे. राज्यातील छोटा व्यापारी, बेरोजगार, शेतकरी यांनी संकटावर मात करून उभे व्हावे पण आत्महत्येचा मार्ग कुणीही स्वीकारू नका, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
दिवाळी सणानिमित्त मूळ गावी सुकळी येथे लक्ष्मीपूजनाकरिता आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पटोले म्हणाले, की आनंदाचा शिधा अद्यापही गरिबांपर्यंत पोहचलाच नाही. त्यामुळे गरीब जनतेला दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे. हे सर्व या नियोजनशून्य शिंदे-फडणवीस सरकारमुळे घडत आहे. गरिबांना शिधा देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे पैसे गरीब जनतेच्या खात्यात रोख स्वरूपात द्यावे. मात्र, शिंदे सरकारने तसे न केल्यामुळे शिधा किट गरिबांपर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे गरिबांची दिवाळी अंधारात घालण्याचे काम राज्यातील ‘ईडी’ सरकारने केल्याचा घणाघाती आरोप पटोले यांनी केला.