भंडारा : काल सकाळी शेतात फुले वेचत असताना एका शेतकऱ्याच्या समोर साक्षात वाघोबा आला आणि या वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले असे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले. अर्थात शेतकऱ्याने तसेच सगळ्यांना सांगितले. त्यानंतर उपचारासाठी या शेतकऱ्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला रेबीजचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतील असे सांगताच त्याची भंबेरी उडाली. आपले पितळ उघडे पडणार या भीतीने तो घामाघूम झाला. वन विभागाच्या चमूने त्याला पुन्हा घटनास्थळी नेले आणि कसून चौकशी केली. अखेर त्याच्यावर वाघाने हल्ला केलाच नाही, वाघाने हल्ला केल्याचा खोटा बनाव त्याने रचल्याचे वन विभागाच्या चमूच्या निदर्शनास आले.

साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील दुधराम राजीराम मेश्राम (४१) या शेतकऱ्याने काल सकाळी स्वतःवर वाघाने हल्ला केल्याचे कथानक रचले. सध्या परिसरात वाघाचा मुक्तसंचार आहेच त्यामुळे सगळ्यांचा आपल्यावर सहज विश्वास बसेल असे त्याला वाटले. “सकाळी शेतात मोहाची फुले वेचत असताना समोर वाघ उभा होता, पण धाडसाने वाघाच्या डोळ्यात डोळे टाकून हळूवार मागे पाऊल टाकत असताना वाघाने समोरून हल्ला केला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. काही वेळानंतर बाजूच्या शेतात कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मी दिसलो आणि त्यांनी मला घरी आणले” असे दुधराम यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वन रक्षक रामेश्वर भराडे आणि बाळू निश्चीत हे दोघेही दुधराम यांच्या घरी पोहचले. दुधराम यांचा शर्ट आणि बनियान फाटलेली होती आणि त्यांच्या पोटावर जखमा होत्या. वन रक्षकांनी दुधाराम यांना ताबडतोब साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांची पाहणी केली असता त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. दुधराम यांनी डॉक्टरांना देखील तशीच कपोलकल्पना सांगितली.

काहीच वेळात लाखनी क्षेत्र सहाय्यक जे. एम. बघेले, वन परिक्षेत्र अधिकारी वंजारी, बीट रक्षक एस. एम. कुंभरे, वनरक्षक नितीन उशीर, बावनकुळे, चेतन जंजाळ, रुपाली राऊत, चित्तरंजन कोरे अशी वन विभागाची चमू रुग्णालयात पोहचली. दुधराम या शेतकऱ्याच्या पोटावरील जखमा वाघाच्या नखाच्या नसल्याची आशंका डॉक्टरांनी बोलून दाखवली. आता दुधराम यांच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक युक्ती केली. दुधराम यांच्या पोटावर वाघाच्या नखांचे विष होऊ नये म्हणून त्यांना रेबीजचे १४ इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. १४ इंजेक्शनची बाब ऐकताच दुधराम यांना घाम सुटला. त्यांनी काहीही झाले तरी इंजेक्शन घेणार नाही असे सांगितले. दुधराम खोट बोलत असल्याची शंका खरी ठरली.

वन विभागाची चमू दुधराम यांना त्यांच्या शेतावर घटनास्थळी घेऊन गेली. त्या ठिकाणी मोहाच्या झाडाला फुलेच नव्हती. त्यामुळे तू कोणती फुले वेचत होता ? असे वन अधिकाऱ्यांनी त्याला विचारले. वाघ नेमका कुठे होता, तो कसा दिसला, तुझ्यापासून किती अंतरावर होता अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच दुधराम निरुत्तर झाले आणि बेशुध्द होतो त्यामुळे ‘मला काहीच आठवत नाही’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले. वन विभागाच्या चमूने परिसराची पाहणी केली असता वाघाच्या पाऊलखुणाही कुठेही दिसून आलेल्या नसल्याचे सहाय्यक वनरक्षक संजय मेंढे यांनी सांगितले. दुधराम झाडावरून पडला असावा किंवा एखाद्या झुडपात पडल्याने त्याला काटे ओरबाडले असावे असा अंदाज व्यक्त वनरक्षक कुंभरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.प्रकाश झोतात येण्यासाठी किंवा वाघाने हल्ला केल्याचे सांगितल्यास पैसे मिळतील या लालसेपायी दुधराम यांनी अशाप्रकारे कपोलकल्पित कथा रचली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र वाघाने हल्ला केल्याचा त्यांचा हा बनाव त्यांच्यावरच उलटला आणि गावात एकच चर्चा रंगू लागली.