लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : काही भरकटलेले शेतकरी जादा पैशांच्या लालसेपोटी गांजाची शेती करतात. याच्यावर स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करण्याच्या घटना घडल्या आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क अफूची लागवड केल्याचे आढळून आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ही बाब उघडकीस आले.

या बहाद्धर शेतकऱ्याच्या घरातून तब्बल साडेबारा कोटींची अफू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील मोठ्या कारवाई पैकी एक असल्याचे मानले जात आहे. अंढेरा शिवारातील संतोष मधुकर सानप (४९) याने त्याच्या शेतात अफूची शेती केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह शुक्रवारी, एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा छापा घातला .

या कारवाईत अंढेरा पोलिसांनी देखील सहकार्य केले. आरोपीच्या ताब्यातून १५ क्विंटल ७२ किलो अफू ताब्यात घेण्यात आली.या मालाची बाजारभावाने किंमत १२ कोटी ६० लाख रुपये एवढी असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपी संतोष मधुकर सानप विरुद्ध ‘ एनडीपीएस’ कायद्याच्या कलम आठ क, अठरा क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. यामध्ये आशिष रोही, रुपेश शक्करगे, सचिन कानडे, प्रताप बाजड, दीपक लेकुरवाळे, वनिता शिंगणे, शेख चांद, पुरुषोत्तम आघाव, सतीश हाताळकर, दिनेश बकाले, राजेंद्र टेकाळे, विजय वारुळे, अनुप मेहेर, विजय पैठणे, विलास भोसले, सुरेश भिसे, शिवानंद मुंडे यांनी ही कारवाई केली.

ज्या शेतात ही कारवाई करण्यात आली ते शेत अंढेरा पोलीस ठाण्यापासून जेमतेम ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र आरोपी सानप चा गोरख धंदा सुरु राहिला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत गांजाची शेती काही ठिकाणी करण्यात येत होती. मात्र आता थेट अफूची ची शेती करतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने अफूची रोपे किंवा बियाणे कुठून आणले? त्याच्याकडून तो माल कोण विकत घेणार होता? असे विविध प्रश्न आता पोलिसांना पडलेले आहेत..त्यामुळे पुढील तपासात आरोपीची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे