शेतकऱ्याच्या घरात सापडले संशयस्पद साहित्य
तुमसर तालुक्यातील खंदाड या गावातील एका शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत एका वाघाचा मृतदेह आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. या प्रकरणी शेतकरी रतनलाल वाघमारे यांच्या घरी वन विभागाने शोध घेतला असता विजेचे वायर आणि ते पसरविण्यासाठी काठ्या आढळल्या. यावरून त्या वाघाचा मृत्यू विजेच्या सापळ्यात अडकूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी आणि वन विभागाने व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तुमसरवरून २८ किलोमीटर अंतरावरील वन परीक्षेत्रालगतच्या धानाच्या शेतीमध्ये बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पोलीस पाटील कमलेश भारद्वार यांना धानाच्या एका शेतामध्ये झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेला वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. गावातील चर्चेनंतर वनरक्षक वासनिक यांचे सोबत शेतात पोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली. संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी या मृत वाघाला झाडाच्या फांद्यांनी झाकून ठेवल्याची कबुली दिली. प्रत्यक्ष घटनास्थळाच्या पहाणीकरून आठ ते दहा दिवसांपूर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
या प्रकरणी पोलीस आणि वन विभागाचे पथक तपास करीत आहेत. शेतकऱ्याची कसून चौकशी सुरू आहे. आपल्या शेतात वाघ मरून पडलेला दिसला. भीतीपोटी आपण त्याला झाकून ठेवल्याची कबुली संबंधित शेतकऱ्याने दिल्याची माहिती शेतकऱ्याने दिली असली तरी त्याच्या घरात सापडलेल्या साहित्यावरून त्याच्यवरील संशय बळावला आहे. मृतदेह कुजून गेल्यामुळे वाघ नर की मादा आहे हे कळू शकले नाही.
हेही वाचा >>> नागपुरात वाहतूक नियम मोडणाऱ्या ३ हजार वाहन चालकांवर कारवाई
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीनुसार मृत शरीराचे विच्छेदन करावयाचे असल्याने समिती गठीत करण्यात आली. सदर समितीत उपवनसंरक्षक राहुल गवई, मानद वन्यजीव रक्षक भंडारा नदीम खान, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी शाहिद खान, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.कल्पना गायकवाड पशुधन विकास अधिकारी नाकाडोंगरी डॉ.एल.के.बारापात्रे डॉ. मुकेश कापगते, डॉ. गजानन गिरी यांना सहभागी करण्यात आले. उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली साकेत शेंडे, सी.जी. रहांगडाले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.