चंद्रपूर : शेतशिवारात शेळ्या चराईसाठी घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवार (ता. १७) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गणेशपूर पातळी येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव चंद्रभान गणपत लोखंडे (वय ७२) असे आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ब्रह्मपुरी तालूका मुख्यालया पासुन २५ कि.मी. अंतरावर जंगलव्याप्त भागात गणेशपूर पातळी हे गाव आहे. या गावातील चंद्रभान लोखंडे हे गावापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर शेतात घरच्या शेळ्या चराईसाठी घेऊन गेले होते. तेंव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघ त्यांना सरपटत काही अंतरापर्यंत घेऊन गेला. सायंकाळी होऊनही चंद्रभान लोंखडे घरी परतले नव्हते. त्यामुळे लोखंडे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांचे शेत गाठले. परिसरात शोधमोहीम राबवित असताना शेतापासून काही अंतरावर चंद्रभान गणपत लोखंडे यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.