बुलढाणा लोकसभेच्या जागावाटप व उमेदवारीचा गुंता कायम असल्याने प्रस्थापित नेत्यांच्या निवडणूक पूर्व प्रचाराला अजूनही गती मिळाली नसल्याचे चित्र आहे. या तुलनेत दोन युवा नेत्यांनी निवडणूक लढवायचीच, असा निर्धार करून ‘राजकीय यात्रां’द्वारे जिल्हा पालथा घालण्यास सुरुवात केली आहे. स्वतःला अपक्ष म्हणवून घेणाऱ्या या तरुणतुर्कांची नजर मात्र राजकीय पक्षांच्या उमेदवारीवर असल्याचे चित्र आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर व ‘वन बुलढाणा मिशन’चे संदीप शेळके यांचा यामध्ये समावेश आहे. तुपकर यांनी ‘स्वाभिमानी’पासून फारकत घेऊन स्वबळावर दीर्घकालीन शेतकरी आंदोलने केली. २०२३ चा उत्तरार्ध त्यांच्या आंदोलनाने व्यापला आणि चालू वर्षात त्यांचा जामीन कायम राहिल्याने त्यांचा उत्साह दुणावला. यंदा लढायचेच या निर्धाराने त्यांनी लोकसभेची तयारी चालविली आहे. सध्या सुरू असलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमाने त्यांनी घाटाखालचे तालुके पिंजून काढले आहे. आता घाटावरील तालुक्यात ही यात्रा पोहोचली आहे.
हेही वाचा >>> यवतमाळ : पुसद येथे आगीत होरपळून वृद्धाचा मृत्यू….चार घरेही बेचिराख…
शाहू परिवारचे संस्थापक संदीप शेळके यांनी सरत्या वर्षात विविध उपक्रम व जंगी कार्यक्रम राबविले. मागील १० फेब्रुवारीपासून त्यांनी परिवर्तन रथ यात्रा सुरू केली आहे. ५० दिवसांत ५०० गावापर्यंत पोहचण्याचे त्यांनी ‘टार्गेट’ ठरविले आहे. विविध कार्यक्रम व रथयात्रांमधून खासदार प्रतापराव जाधव व सत्ताधारी नेत्यांविरुद्ध आक्रमक भाषणाचा धडाका लावला आहे. आपल्यावर प्रसिद्धीचा झोत राहील, यादृष्टीने नियोजन केले आहे.
समान निर्धार अन् समान उद्दिष्ट
यंदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढायचीच, असा दोघांचा निर्धार आहे. अपक्ष असो किंवा ऐनवेळी पक्षाचे ‘तिकीट’ मिळो, लढायचेच, असे त्यांनी ठरवले आहे. एकेकाळचे हे घनिष्ठ मित्र लोकसभेनिमित्त एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. या दोघांचे युती व आघाडीसोबत देखील ‘कनेक्शन’ आहे. यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांवरदेखील त्यांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने दोघेजण आघाडी, युतीच्या (अगदी मनसेच्याही) मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. बुलढाणा जिल्ह्यासह अन्यत्र त्यांच्या बैठका झाल्याची चर्चा आहे. त्यांचे पक्षीय उमेदवारीचे मनसुबे कितपत पूर्ण होतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच, मात्र ते विफल झाले तरी निवडणूक लढणे त्यांच्यासाठी अटळ ठरले आहे. याचे कारण शेळके आता खूप पुढे गेले आहे. दुसरीकडे, मागील निवडणुकीत संधी हुकलेल्या तुपकरांनी आता माघार घेतली तर त्यांचे एकूण राजकारणच धोक्यात येईल, हेही तेवढेच खरे!