बुलढाणा: लाखो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे जाहीर करीत, येत्या २९ नोव्हेंबरला मुंबईस्थित मंत्रालय ताब्यात घेणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. या ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाअंती स्टेट बँक मार्गावर आयोजित जाहीर सभेत तुपकर यांनी नियोजित आंदोलनाची घोषणा केली. संध्याकाळी उशिरा पार पडलेल्या या सभेच्या व्यासपीठावर राज्यातील शेतकरी नेते, पदाधिकारी हजर होते.
हेही वाचा… अकोला: दोन गटात वाद; किरकोळ कारणावरून तुरळक दगडफेक, तणावपूर्ण शांतता
शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे. सोयाबीनला ९ हजार आणि कापसाला किमान १२ हजार रुपये दर मिळावा, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. सरकारने सात दिवसांत या मागण्यांची पूर्तता केली नाही तर २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेणार आहोत. हिंमत असेल तर सरकारने माझ्यासह शेतकऱ्यांना यापासून रोखून दाखवावे, असे आवाहनही तुपकर यांनी राज्य सरकारला दिले.
तत्पूर्वी, जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल येथून निघालेल्या एल्गार मोर्चात तुपकरांसह शेतकरी नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते व जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयस्तंभ परिसर, बाजारपेठ, असे मार्गक्रमण करून हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागील आंदोलनात झालेला संघर्ष आणि पोलिसांनी केलेला लाठीमार लक्षात घेता यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिजामाता संकुल, जिल्हाधिकारी परिसर आणि मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.