अकोला : सोयाबीन, कापसाच्या भावासह पीकविम्याच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नक्षलवादी-दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. बुलढाणा येथे शेतकरी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अकोला कारागृहात ठेवण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लहानपण देगा देवा…! चिमुकल्यांनी वृक्षाला आंलिगन देत साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’; समाजासमोर नवा आदर्श

या प्रकरणात बुधवारी त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर आज अकोला कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “सोयाबीन, कापसाचे भाव पडलेले आहेत. त्या पिकांना भाव देण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीमार केला. नक्षलवादी-दहशतवाद्यांसारखी वागणूक आम्हाला पोलिसांनी दिली. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. असे जेलमध्ये टाकून घाबरणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आता महाराष्ट्रभर ही लढाई सुरूच राहणार आहे. याप्रकारचे हजारो गुन्हे दाखल झाले तरी काही फरक पडणार नाही. शेतकरी आता एकजूट झाला आहे. सरकारला व पुढाऱ्यांना शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.” लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader ravikant tupkar attack state government after released from jail ppd 88 zws