बुलढाणा : सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही. या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप करत पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ११ फेब्रुवारीला बुलढाणा अथवा मुंबईत आत्मदहन करणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एक तर आत्मदहन करू द्या, अथवा बंदुकीच्या गोळ्या घाला, आता मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – ‘अमृत काळात तरी भटके-विमुक्तांना नागरिकत्वाचा अधिकार द्या’; बाळकृष्ण रेणके यांची मागणी
हेही वाचा – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ११ फेब्रुवारीला पहिल्यांदा येणार नागपुरात
कापूस, सूत व डीओसी तसेच सरकीची ढेप निर्यात करण्याला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करू नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क २० टक्के करावे, जी. एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, या मागण्या आम्ही लाऊन धरल्या आहेत. परंतु, सरकार याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही, असा आरोप करीत तुपकरांनी आता आक्रमक पवित्रा घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.