वर्धा : रस्त्यावर अपघात झाला आणि जखमी प्रवासी दिसले की पाहून धूम ठोकणारेच अधिक. भानगडीत पडायला नको म्हणून पळ काढण्याची वृत्ती स्वाभाविक. मात्र या घटनेत कार्यक्रमास वेळ होण्याची चिंता नं ठेवता थबकलेल्या गाडीने अखेर युवकाचे प्राण वाचविण्यास हवी ती धावपळ केली. या व्हीआयपी गाडीत माजी खासदार रामदास तडस व सहकारी होते. ते एका कर्यक्रमासाठी निघाले होते. वाटेत धोत्रा फाट्यावर एक युवक रक्तबंबळ अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे या गाडीच्या वाहनचालकास दिसले.
रस्त्यात ढाब्यावर उभ्या ट्रकला या दुचाकीची धडक बसली असावी. मात्र कोणीच लक्ष देत नसल्याचे पाहून तडस यांनी त्यांचे पीए विपीन पिसे यांस मदत करण्यास पाठविले. संबंधित आरोग्य, पोलीस यंत्रनेस फोन केले. मात्र वेळेवर रुग्ण वाहिका किंवा अन्य मदतीस नं आल्याने स्वतः तडस व सहकाऱ्यांनी निपचित युवकास गाडीत टाकले. जवळचे रुग्णालय असलेल्या हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेवर सहाय्यक हजर नसल्याने सदर युवकास तडस यांनी स्वतः स्ट्रेचरवर टाकून ढकलत खाटेवर नेले. माहिती दिली असल्याने डॉक्टर हजर होते पण स्वतः माजी खासदार असेल असे कोणीही अपेक्षित ठेवले नाही. स्थानिक आमदार येतील नाही येतील म्हणून तडस यांनी धावपळ करीत या युवकाचे प्राण वाचविण्याची धावपळ केल्याचे त्यांच्या गाडीत उपस्थित काहींनी सांगितले. मात्र युवकावर अधिक उपचार आवश्यक असल्याचे लक्षात आले.
तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी नागपूरला हळविण्याचा विचार मांडला. तेव्हा तडस यांनी नागपूरच्या खाजगी रुग्णालयास फोन करीत ही माहिती देत काळजी घ्या म्हणून सूचविले. आता तो जखमी व यमाशी झुंज देणारा युवक प्रज्वल ढगे असल्याची माहिती पुढे आली आहे. कुठेतरी कामगार असून काम आटोपून तो घराकडे निघाला असतांना हा अपघात घडला. हिंगणघाट रुग्णालयाने त्यास पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेत टाकून पाठविले तेव्हाच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. गाडी निघाली तेव्हा रामदास तडस व सहकारी त्यांचे शुभ्र कपडे रक्ताने लाल झाल्याचे बघून आता कार्यक्रमास जायचे कसे, या विचारात पडले होते. याबाबत रामदास तडस यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यास संपर्क होवू शकला नाही.