वर्धा : फायनान्स कंपनीच्या कर्जाने त्रस्त झालेले अनेक असतात. मात्र कंपनीचा तगादा जीव नकोसा करून टाकतो तेव्हा काही टोकाचे पाऊल उचलताना दिसतात.
आर्वी तालुक्यातील खरांगना येथील हरिदास काशिनाथ इवनाथे या युवकाने एका फायनान्स कंपनीकडून गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. ते परत करण्यास तो असमर्थ ठरत होता. त्यातच व्याजासह कर्ज परत घेण्यासाठी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी ससेमिरा लावला. त्याने त्रस्त झाल्याने तो सतत चिंतेत असायचा. शेवटी राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्याच्या मागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी आहे.
हेही वाचा – नागपुरात शंभरात पाच मुले गालफुगीचा त्रास घेऊन डॉक्टरांकडे, शासनाकडून लसीकरणही नाही
हेही वाचा – अमरावती : पत्नीचे अनैतिक संबंध; पतीची आत्महत्या
पोलीस पाटील निनाद बोंद्रे यांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दुसऱ्या एका घटनेत सेलू तालुक्यातील महाबळ येथील मारोती लक्ष्मण उमाटे या शेतकऱ्याने शेतात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्यावर बँकेचे तसेच खासगी कर्ज होते. सततची नापिकी झाल्याने त्यांच्या डोक्यावरील कर्ज व व्याजाचा विळखा वाढत चालला होता. शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने ते विवंचनेत होते. घर चालविण्यात ओढाताण होत होती. अखेर काम असल्याचे सांगून ते शेताकडे गेले व तिथेच आत्महत्या केली. त्यामुळे पत्नी, दोन मुले अनाथ झालीत. त्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. या परिवारास आधार मिळावा म्हणून शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी गावकरी करीत आहे.