यवतमाळ : प्रत्येक पक्ष सत्तेसाठी शेतकऱ्यांचा वापर करीत असून राज्यातील शेतकरी-शेतमजूर यांना सरकार केवळ पोकळ आश्वासन देत आहे. कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही. त्यामुळे शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झरीजामनी तालुक्यातील गवारा गावात काळे झेंडे दाखवून कपाशी व सोयाबीनची पेरणी केली.
हेही वाचा >>> वाघाने झाडाझुडपातून समोर येत डरकाळी फोडली अन्…
शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचे राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना लागवडीसाठी एकरी १० हजार रुपयांची मदत करावी, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून २४ तास मोफत वीज पुरवठा पुरविण्यात देण्यात यावा, शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून दहशतमुक्त करून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाने पावले उचलावीत, वन्यप्राण्यांपासून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आठवड्यात नुकसानभरपाई द्यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी यासह विविध मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.