अमरावती : शेताच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना धारणी तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन ऊर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे (२६) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अकरावीची विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती ; प्रियकराचे नाव सांगण्यास नकार

धारणी तालुक्यातील एका गावात ५१ वर्षीय मृत महिलेची शेती आहे, तर आरोपी सचिनचीदेखील तेथे शेती आहे. बुधवारी सकाळी ही महिला शेतात आली. तेथे शेताच्या बांधावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्यात बाचाबाचीनंतर झटापट झाली. त्यादरम्यान, सचिनने शेताच्या बांधावर तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने तिची दगडाने ठेचून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने तिला घटनास्थळी निर्वस्त्र टाकून पळ काढला. सायंकाळचे सात वाजूनही पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले.

त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली. शेताच्या बांधावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त्र व मृतावस्थेत आढळली. त्याने लगेच गावात पोहचून पोलीस पाटील यांना माहिती दिली, त्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. आरोपीचा रात्रीच शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून महिलेचे पार्थिव कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer woman killed after rape in amravati zws