लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय हवामान खात्याने मोसमी पावसाचा अंदाज देताना यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी येणार, पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असे सांगून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या. आता मात्र हेच हवामान खाते शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका असा सल्ला देत आहे. खात्याच्या या अंदाजाने शेतकरी देखील चक्रावला असून नेमके करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.

भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षीच राज्यात मोसमी पावसाच्या घोषणेची घाई केली जाते. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला की राज्यातही लागलीच घोषणा केली जाते. या अतिघाईमुळे शेतकऱ्यांचे कित्येकदा नुकसान झाले आहे. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. तरीही खात्याची मोसमी पावसाच्या घोषणेची घाई मात्र अजूनही कायम आहे.

आणखी वाचा-महापारेषणची पदभरती प्रक्रिया रद्द, उमेदवारांमध्ये संताप; एसईबीसी आरक्षणावरून…

यावर्षी देखील खात्याने वेळेपूर्वीच मोसमी पाऊस राज्यात दाखल झाल्याचे सांगितले आणि त्यावर विश्वास ठेवून शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पाऊस दडी मारून बसला आहे. हवामान खात्याने यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज दिला होता.

प्रत्यक्षात पहिल्याच महिन्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मोसमी पावसाची वाटचाल मंदावली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, ते चिंतेत आहेत. तर काही भागातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

आणखी वाचा-यवतमाळ : बकरी ईद साजरी होत असताना वीज कोसळून २१ बकऱ्या ठार, शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांमध्ये मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पौर्णिमेदरम्यान पाऊस महाराष्ट्रात दमदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे.पुढील पाच दिवसात मोसमी पावसाची बंगाल शाखा पूर्व भारतात पुढे झेपावेल तर मोसमी पावसाची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाछायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ जूनपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे.

पूर्व विदर्भाला अजूनही मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आज मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका असेल असं हवामान विभागानं म्हटले आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच ताशी ४० ते ५० च्या गतीने वारे वाहतील असा अंदाज आहे.

हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांनाही आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.