अमरावती विभागातील अकोला वगळता इतर चार जिल्ह्यांची सुधारित पैसेवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमी आल्याने दुष्काळाचे सावट असून संपूर्ण विभागात ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.यंदा जिल्ह्यात पावसाळ्यात चारही महिने झालेल्या पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली. कापूस, सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. मूग आणि उडीद ही पिकेही हातून गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर चांगल्या स्थितीत उभे असलेले पीक वाहून गेले. घरांचीही पडझड झाली असून, पशुधनही मृत्युमुखी पडले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा >>>नागपूर : राणा- कडू वादावर नवनीत राणांचे मौन
पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांपेक्षा जास्त जाहीर झाल्यास शेतमालाची स्थिती उत्तम आहे, असे पैसेवारीचे समीकरण आहे. पैसेवारीच्या आधारावर शासनाकडून दुष्काळाची परिसीमा निश्चित होते. दुष्काळाची घोषणा झाल्यास कर्ज पुनर्गठण, सक्तीची कर्जवसुली न होणे, शालेय शुल्क, शेतसारांबाबत दिलासा देता येतो. अकोला जिल्ह्यात १०१२ महसुली गावे असून, त्यातील ९९० गावांमध्ये खरीप पिकांची लागवड होते. यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील जिल्ह्यांची सरासरी सुधारित पैसेवारी ५३ पैसे असल्याचे घोषित झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील १९४९ पैकी १५४४ गावांची पैसेवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमी आली आहे, तर ४०० गावांमध्ये ती पन्नासपेक्षा जास्त आहे. वाशीम जिल्ह्यातील एकूण ७९३ गावांची सरासरी पैसेवारी ही ४७ पैसे इतकी आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०४६ गावांमधील पैसेवारी ही ४७ पैसे आली आहे. अमरावती विभागातील ७३६८ गावांपैकी ७२०७ गावांतील क्षेत्र खरीप हंगामात पेरणीखाली होते. ४८६६ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली. २३४१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.
हेही वाचा >>>अकोला : राजस्तरीय युवा साहित्य संमेलनातून युवकांमध्ये वाचन अभिवृद्धी – डॉ. पाटेकर
अकोला जिल्ह्यातील सर्व ९९० गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक आली. बुलढाणा जिल्ह्यातील १४१९ पैकी ४८३ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. अमरावती, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यांची पैसेवारी ४७ पैसे आली. ही सुधारित आणेवारी असली व दुष्काळ या आणेवारीवर जाहीर होत नसला तरी नजरअंदाज आणेवारीनंतर सुधारित आणेवारीत उत्पादनाची सरासरी घसरल्याचे स्पष्ट झाले.
अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर होणार
ऑक्टोबर अखेरीस सुधारित पैसेवारी जाहीर झाल्यानंतर आता ३१ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर सवलत, मदतीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. पैसेवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आल्यासच त्यानुसार सवलत किंवा नुकसान भरपाई मिळेल. यंदा परतीच्या पावसानेही प्रचंड धुमाकूळ घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.