अमरावती : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला, त्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम विमा कंपन्यांनी देणे अत्यावश्यक होते, पण यात मोठा घोळ समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून देखील विमा कंपन्यांनी अग्रिम देण्याचे टाळले. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू, असा इशारा सत्तारूढ गटातील आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विमा कंपन्यांनी टाळाटाळ चालवली असून विम्याच्या रकमेचे असमान वाटप होताना दिसत आहे. शेजारी-शेजारी शेती असूनही नुकसानभरपाईच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली आहे. नुकसानीनंतर पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के अग्रिम देणे आवश्यक होते. पण, ही रक्कम देण्यात आली नाही. यासंदर्भात संजय देशमुख यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले.

हेही वाचा >>> पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या वंदे भारतवर दगड फेकले

दरम्यान, याच विषयावर आमदार बच्चू कडू यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली. त्यांनी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. २५ टक्के अग्रिम न दिल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कृषी सचिवांशी देखील बच्चू कडू यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील सुमारे १ लाख १७ हजार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मिळणे आवश्यक होते. पण, ते विमा कंपनीने दिलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचे पालन झालेले नाही. ८१ मंडळांमध्ये नुकसान भरपाई प्रस्तावित असताना विमा कंपनीने केवळ ९ मंडळे गृहीत धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात आता जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत प्रस्ताव पाठवून तोडगा काढला जाणार आहे. सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना काही कारणांमुळे पूर्वसूचना देता आली नाही. त्यांचाही विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू, असे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> गडचिरोली : भूमाफियांचा प्रताप; वनविभागाच्या जमिनीवर लेआऊट टाकले, अन्…

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे, महानगर प्रमुख बंटी रामटेके, योगेश लोखंडे, रणजित खाडे, योगेश भुसारी, अंकुश गायकवाड, कपिल उमप, रोशन देशमुख, प्रवीण केने, देवानंद भोंडे, शरद खरोडे, सुरेन्द्र भिवगडे, नरेंद्र काकडे, भूषण गाढे, साहेबराव फटींग, सुरज कुर्जेकर, पंकज चौधरी, विजू ढोले, विजय डोंगरे आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers do not get justice mla bachu kadu warns the officials nagpur news mma 73 ysh