अमरावती : मेळघाटातील चिखलदरा परिसरातील शेतकरी आजवर संपूर्णपणे पारंपरिक पिके घेऊनच उदरनिर्वाह करीत असत. मात्र बदलत्या काळानुसार या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली आहे की, चिखलदरा या पर्यटन स्थळी येणारे देशभरातील नागरिक येथे स्ट्रॉबेरीचा आस्वाद आवर्जून घेत आहेत. चिखलदऱ्यात पिकवलेली स्ट्रॉबेरी नागपूरमार्गे राज्यासह देशभरातील इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचू लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून चार ते पाच गावांतील शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करीत आहेत. अमरावती येथील श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीने चिखलदरा तालुक्यात २०१४-१५ मध्ये माती परीक्षण केल्यावर या मातीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकते हे स्पष्ट झाले.
चिलखदरा तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये सुमारे ५० शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहित करणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला. पहिल्याच वर्षी सर्वच शेतकऱ्यांना किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न झाले. यानंतर शेतकऱ्यांना स्वखर्चाने स्ट्रॉबेरी लागवड करायची होती. सुमारे २५ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. मोथा या गावात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक उत्पन्न झाले, अशी माहिती स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. स्थानिक बाजारपेठेत दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलो दराने स्ट्रॉबेरी विकली जाते. पर्यटक मोठ्या आवडीने ती चिखलदरा येथील स्टॉलवरून विकत घेतात. गेल्या आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन चिखलदरा तालुक्यामध्ये घेतले जाते. जादा उत्पादन झाल्यास चिखलदऱ्याहून निघालेल्या चवदार स्ट्रॉबेरीचा परतवाडा, अमरावती ते नागपूर असा प्रवास होतो.
स्ट्रॉबेरी हा एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर असून आता अल्पभूधारक शेतकरी देखील हा प्रयोग करुन पाहत आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीचा एकरी खर्च ३ लाख रुपये येतो. लागवड केल्यापासून दोन महिन्यांमध्ये उत्पादनाला सुरवात होते. सध्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरु असून हा हंगाम मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि बेरोजगारांच्या हाताला कामही यामुळे मिळत आहे. दिवसाकाठी एका एकरातून ३० ते ४० किलो स्ट्रॉबेरीचे उत्पन्न निघत आहे. मोथा, मडकी आणि आलाडोह या गावातील स्ट्रॉबेरीची शेती ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्ट्रॉबेरी म्हटली की, लालबुंद, गोड आणि दिसायला छान, असे फळ खाण्याचा आणि त्याची प्रत्यक्ष शेती पाहण्याची हौस पर्यटक आवरू शकत नाही. विदर्भातील पर्यटकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरत आहे.