लोकसत्ता टीम
अकोला : वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच लागवडीच्या नव्या वाटा निवडत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया पिकाने अल्पावधीतच आकर्षित केले. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चिया लागवडीकडे बळीराजा वळत असून जिल्ह्यात तीन हजार ६०८ हेक्टरवर उत्पादन घेतले जात आहे. चिया लागवड प्रयोगासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
वाशीम जिल्ह्यात चियाची लागवड प्रोत्साहनासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम सुरू करण्यात आली. चिया लागवडीसाठी योग्य जमीन आणि काळाची निवड, कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठीच्या पद्धतीसोबतच सेंद्रिय लागवड करण्याचे फायदे आहेत. जिल्ह्यात मालेगाव एक हजार १६९ हेक्टर, रिसोड ९७२ हेक्टर, वाशीम ७५३ हेक्टर, मंगरूळपीर ५९८, मानोरा ४४ हेक्टर आणि कारंजा ७२ हेक्टरवर चिया पिकाची लागवड केली आहे. यंदा रब्बी हंगामात चिया बिजांची लागवड एक हजार एकरांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आले.
आणखी वाचा-शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
चियाला ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. याचे बियाणे पोषणतत्वांनी समृद्ध आहेत. हृदयविकार टाळण्यात मदत, साखर नियंत्रणाससह ‘अँटीऑक्सिडंट्स’ त्वचेसाठी उपयुक्त आहेत. वाशीम जिल्हा हे चिया उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. चियाच्या लागवडीमुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्राला नवा आयाम मिळाला. हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत ठरले आहे. यामुळे जिल्ह्याचे आर्थिक चित्र सकारात्मकपणे बदलू शकते.
१४ हजार रुपये प्रति क्विंटल दर
वाशीम जिल्ह्यात चियाची लागवड प्रोत्साहनासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत पुण्यातील एका नामांकित कंपनीने १४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया खरेदी करण्याचा करार केला. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठेची हमी मिळाली आहे.
आणखी वाचा-नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
चिया लागवडीच्या विशेष उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया बिजांना चांगला बाजारभाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. -बुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी, वाशीम.
चियाची लागवड करताना आम्हाला कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळाले. बाजारपेठ उपलब्ध असल्याने आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत. -संतोष पाटील, शेतकरी, रिसोड.