चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील पोवनी गावाजवळ असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स कोळसा खाणीत कार्यरत बुद्धा कंस्ट्रक्शन या कंंत्राटी कंपनीने परिसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना काम न देता सरळ परप्रांतीय कामगारांची भरती केली आहे. यामुळे येथे मोठा असंतोष निर्माण झाला असून शेजारच्या सात गावातील बेरोजगार युवकांना न्याय व नोकरी मिळावी, या मागणीसाठी शेतकरी शेतकरी संघटनेने बुद्धा कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनीचे गेट समोर आणि माईन्स मध्ये काम रोको आंदोलन केले. रखरखत्या उन्हात बेरोजगार युवकांनी कंपनीला धडक दिल्याने सुमारे पाच तास कंपनीचे काम बंद होते. अखेर दुपारी तिन वाजता व्यवस्थापनाने मागण्या मंजूर केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या राजुरा तालुक्यात सुमारे सहा खाणी असून येथे कंपनीने माती आणि कोळसा उत्पादन करण्याचे कंत्राट काही ठेकेदारी कंपनीला दिले आहे. यापैकी एक असलेल्या बुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी ने या भागातील बेरोजगारांना काम न देता येथे परप्रांतीय युवकांना नौकरीवर नियुक्त केले. गावातील शेतक-यांची जमिन अधिग्रहित झाल्यावर गावाच्या जवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध असतांनाही नौकरीपासून वंचित ठेवण्यात आले. यामुळे येथे असंतोष निर्माण झाला. अखेर शेतकरी संघटनेने बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी कंबर कसली.
आज सकाळी नऊ वाजता पासून शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात बुध्दा कंपनीचे मुख्य द्वार व माईन्स भागात काम बंद आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देऊन बेरोजगार युवकांनी हा परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, निळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, दिलीप देठे, विनोद बारसिंगे, कपिल इद्दे, सचिन कुडे, पोवनी सरपंच पांडूरंग पोटे, श्याम काटवले, मारोती लांडे, मंगेश मोरे, महादेव ताजणे, रमेश गौरकार, हरिश्चंद्र जुनघरी, लहू चहारे, हरीदास बोरकुटे, गिरीधर सोनेकर, विशाल जीवतोडे, बंडू कोडापे, विजय मिलमिले, चेतन बोभाटे, किशोर डेरकर, अनिल डाखरे, साईनाथ पिंपळशेंडे, सुरज गव्हाणे, सुमन जंगलीवार, गजानन भोगेकर, अक्षय वैरागडे, आशिष गिरसावळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात या भागातील शेकडो तरुण व बेरोजगार तरुण सहभागी झाले.
आंदोलना दरम्यान गोवरी उपक्षेत्रीय व्यवस्थापक कुमरैय्या, व्यवस्थापक उदय ब्राम्हणे, कार्मिक व्यवस्थापक हरीश व वेकोलिचे अन्य अधिकारी आणि बुद्धा कंपनीचे अधिकारी व्यवस्थापक नागराज व प्रसाद चर्चेला आले. यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांनी गावकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आणि त्या पूर्ण करण्याचे आवाहन व्यवस्थापनाला केले. त्यानंतर व्यवस्थापक यांनी वेळ मागून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
बुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी ही वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड च्या वतीने कोळसा उत्पादन करण्याचे काम गोवरी आणि पवनी ओपन कास्ट कोळसा खाणीत करीत आहे. मात्र या खाणीचे शेजारील गावात स्थानिक बेरोजगार मोठ्या संख्येने उपलब्ध असतानाही आणि स्थानिक बेरोजगारांना कंपनीत काम मिळणे हा त्यांचा अधिकार असतानाही कंपनी मात्र परप्रांतातील नागरिकांना नौकरी देत आहे. याविषयी कंपनी शेजारच्या अनेक गावांतील बेरोजगार तसेच सरपंच यांनी अनेकदा मागणी करून आणि क्षमता व पात्रता असूनही आणि काहींची ट्रायल होऊनसुद्धा स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्यात आलेली नाही. अखेर याविरुद्ध शेतकरी संघटनेने बुध्दा कंपनी विरुद्ध एल्गार पुकारला असून ७ एप्रिल ला सकाळी दहा वाजता पासून काम रोको आंदोलन करण्यात आले.
स्थानिक बेरोजगारांना यथाशीघ्र नोकरीत सामावून घ्यावे तसेच ट्रायल झालेल्या सर्व बेरोजगारी युवकांना नोकरीत सामावून घ्यावे, ही प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. अखेर शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनापुढे व्यवस्थापन नमले आणि त्यांनी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करून ट्रायल झालेल्या युवकांना त्वरीत कामावर घेण्याचे आणि अन्य स्थानिक बेरोजगारांना टप्प्याने कामावर घेण्याचे मान्य केले.अखेर दुपारी तिन वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार आणि पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला.