गोंदिया:- शेतकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सडक अर्जुनी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. कार्यालयात अभियंत्यासमोर समस्या मांडताना एका शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले.

सडक अर्जुनी तालुक्यात रब्बी पिकाअंतर्गत शेतकऱ्यांनी धानाची व इतर पिकाची लागवड केली आहे. परंतु, २४ तास विद्युत पुरवठा नसणे, व्होल्टेज नसणे, वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे यामुळे शेतकरी त्रासले. त्यामुळे रेंगेपार, खजरी व चिरचाडी, शेंडा, वडेगाव या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या घेऊन सडक अर्जुनी तालुक्यातील महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी देवरी येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धम्मपाल फुलझेले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांत विद्युत विषयी समस्याचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तथापि, आम्ही यापूर्वी अनेक निवेदने, पत्रे दिलीत. काही उपयोग झाला नाही. दोन नाही तर पाच दिवसांत आमच्या

समस्याचे निराकरण करा, आम्ही पाच दिवसांपर्यंत वाट पाहू. पाच दिवसानंतर आम्ही निवेदन देणार नाही, वाट पाहणार नाही, तर अत्यंत तीव्र आणि उग्र आंदोलन करू असा धमकीवजा कडक इशाराच शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

सडक अर्जुनी येथील आंदोलनस्थळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील रेवतकर उपस्थित होते. आंदोलनात शेतकरी गौरेश बावनकर, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, राजेश कापगते, रमेश मेंढे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

आमदार राजकुमार बडोले यांच्या निर्देशाला दाखवली केराची टोपली

शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर समस्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ही समस्या आ. राजकुमार बडोले यांना कळवली त्यांनी आपल्या निवासस्थानी दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी बैठक घेतली या बैठकीत महावितरणचे अधिकारी अभियंता उपस्थित होते. तालुक्यातील विजेच्या संदर्भातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याच्या सूचना आ. बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या परंतु आज २२ दिवस लोटूनही समस्या मार्गी लावता त्यांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत नागरिकांनी सडक अर्जुनीचे सहाय्यक अभियंता रेवतकर यांचे दालनात ठिय्या आंदोलन केला.

या मागण्यांचा होता समावेश

प्रामुख्याने आमगाव उपकेंद्र बंद असल्याने मोहाडी येथील वळवलेली डव्वा येथील वीज बंद करावी व क्षेत्रात विजेचा दाब सुरळीत राहावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीपंपाची व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल या प्रमुख मागण्या मांडल्या. अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून प्रमुख मागण्या मार्गी लावल्याने आंदोलन मागे घेण्यात आला. येत्या पाच दिवसात विजेचा दाब व्यवस्थित न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

” वारंवार होणारा त्रास लक्षात घेता मोहाडी येथील डव्वा उपकेंद्रातून गेलेली अतिरिक्त वीज बंद केल्यास परिसरातील नागरिकांना योग्य ती वीज मिळू शकते व खोडशिवनी येथील उपकेंद्र सुरू झाल्यास संपूर्ण तालुक्यातील विजेची समस्या मार्गी लागू शकते सदर समस्या येत्या पाच दिवसात मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल व त्या आंदोलनात अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण अधिकाऱ्यांची राहील.”-गौरेश बावणकर  पिडित (शेतकरी)