वर्धा : कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता बोलबाला आहे. पण त्यावर मात करतील असे उपाय पण काही शोधतात. मानव – वन्यप्राणी संघर्ष नवा नाही. त्यावर शासकीय उपाय पण फेल ठरले. त्रस्त गावकरी मग उपाय शोधू लागले आणि अनुभवातून उपाय आला. घरच्या गृहिणीच्या जुनाट साड्या कामास आल्या. वेशीवर, शेतशिवारात रंगबिरंगी साड्या फडफडू लागल्या. हिंस्त्र पशू घाबरू लागले. गावकरी निर्धास्त झाले. आश्चर्य वाटावे असा हा उपाय समुद्रपूर तालुक्यातील गिरड पंचक्रोशीत दिसून येत आहे.
नेमका काय आहे हा उपाय ?
या परिसरात वाघ, रानडुकरं, कोल्हे अशा वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे पिकांची हानी व गावात हल्ले, अशा घटना घडतात. त्रस्त गावकरी उपाय शोधू लागले. विविध कंपन्यांनी वन्यप्राणी पळवून लावण्यासाठी काही उत्पादने बाजारात आणली. जनावराची विष्ठा व मृत जनावरांच्या काही अवयवचा वापर करून औषध तयार केले आहे. जनावरे पळवून लावण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. मात्र त्यास जनावरे जुमानत नसल्याचे दिसून आल्याचे शेतकरी गजानन गरघाटे सांगतात. म्हणून जुन्या साड्यांचा प्रयोग करण्याचे ठरले. साड्यांचे कुंपण घालण्यात आले. बऱ्यापैकी फायदा होत असल्याचे सांगितल्या जात आहे.
पिकाला संरक्षण
गिरड येथील बंडू गुरफोडे म्हणतात की पोथरा नाल्याच्या काठावरील माझ्या शेतात गहू व अन्य पिके आहेत. वाघाचा वावर असल्याने शेतात राखनदारी करता येत नाही. तसेच वन्यप्राण्यांचा त्रास असल्याने हताश झालो. म्हणून साड्या शेताभोवती लावल्या. आता जनावरे शेतात शिरत नाही. मागील वर्षापासून या उपायाचा अवलंब सुरू केला. पिकाला संरक्षण मिळाले.
म्हणून जनावरे फिरकत नाही
जोगीनगुम्फा येथील चक्रधर भगत सांगतात की, शेत रक्षणासाठी जुने कपडे, साड्या वापरल्या जात आहे. वापरातील कपड्यांना मानवी गंध असतो. जनावरे काही काळ फिरकत नाही. फायदा होतो पण हा काही कायमस्वरूपी असू शकत नाही. गिरडचे शंकर भिसेकर हे आपल्या अनुभवातून स्पष्ट करतात की, पूर्ण शेतास कुंपण लावणे शक्य नाही. पण ज्या दिशेने प्राण्यांचा अधिक धोका असतो त्या दिशेने साड्या लावल्या तर प्राणी जवळ भटकत नाही. पिक हानी टळते. असे हे अनुभव पुढे येतात. शेतकऱ्यांना पिक पेरणी ते काढणीपर्यंत पिक राखण्यासाठी विविध उपाय करावे लागतात. विजेचे कुंपण आपत्ती ओढवणारे. म्हणून सध्या साडीचा आधार शेतकरी घेत असल्याचे दिसून येत आहे.