पीक वाचविण्याच्या प्रयत्नात वन्य प्राण्यांचा बळी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वन्यजीवांच्या शिकारीसाठी आतापर्यंत शिकारीच वीजप्रवाहाचा वापर करत होते, पण आता याच वन्यजीवांपासून शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वीजप्रवाहाचा वापर करावा लागत आहे. यात वन्यप्राण्यांना मारणे हा त्यांचा हेतू नाही, पण पीक वाचवताना वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो हे नक्की आहे. प्रामुख्याने तृणभक्षी प्राणी आणि मग तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर असलेले वाघ, बिबटय़ा वीजप्रवाहाचा बळी ठरतात. गेल्या काही वर्षांत या घटना वाढल्या आहेत. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील अवघ्या दोन ते अडीच वर्षे वयाच्या मृत्युदंड ठोठावलेल्या वाघिणीचा मृत्यू अचानक वीजप्रवाहाने व्हावा, या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
वीज प्रवाहाने वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना संरक्षित क्षेत्र, वन्यजीवांचे संचारमार्गातच घडून येतात असे नाही, तर जंगलाला लागून असलेल्या क्षेत्रात आणि शेतातही या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. प्रामुख्याने वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील जंगलालगतच्या शेतांमध्ये हा प्रकार नेहमी घडतो. देशभरातच वीजवाहिन्या खुल्या आहेत. या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासंदर्भात विचार सुरू असला तरी अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही. वीजवाहिन्या भूमिगत करण्याची सर्वाधिक गरज जंगल आणि जंगलालगतच्या परिसरात आहे. कारण याठिकाणी वीजप्रवाहाने वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वन्यप्राण्यांना मारणे हा शेतकऱ्यांचा उद्देश नसतो, पण शेतातील वन्यप्राण्यांचा धुमाकूळ आणि त्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेताच्या कुंपणावर वीजप्रवाह सोडला जातो. वीजवाहिन्या खुल्या असल्यामुळे तार टाकून वीजप्रवाह कुंपणावर सोडणे त्यांना सहज शक्य होते. काही वर्षांपूर्वी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा आला होता, पण महावितरणच्या अधिकारी प्रस्ताव समजून घेण्यापूर्वीच अंमलबजावणी महागात पडेल म्हणून हात वर केले. राज्यातल्या ५० संरक्षित क्षेत्रातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. त्यावर पर्याय म्हणूान दरवर्षी २०-२० कोटी रुपये देण्याचे आणि त्यानुसार काम होईल असे बैठकीत वन्यजीवतज्ज्ञांनी सुचवले. राज्य तसेच केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या आणि संरक्षित क्षेत्रातून जाणाऱ्या वीजवाहिन्यांचे प्रस्ताव येतील तेव्हा त्यानां भूमिगत वीजवाहिन्यांच्या अटीवर परवानगी देण्यात यावी, यावरही शिक्कामोर्तब झाले. मात्र, वन आणि अर्थ खात्याची धुरा एकाच व्यक्तीच्या हातात असतानादेखील या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही.
चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्हय़ातील बोर अभयारण्यालगतच्या शेतातील कुंपणावर वीजप्रवाह सोडण्याचा प्रकार मोठय़ा प्रमाणावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील शेतकरी नुकसान सहन करीत आहेत. वन्यप्राणी शेतातील पीक उद्ध्वस्त करीत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागते. त्या तुलनेत वनखात्याकडून मिळणारा मोबदला पुरेसा नसतो आणि तो देखील वेळेवर मिळत नाही. म्हणून नाइलाजास्तव शेतकरी वीजप्रवाहाचा पर्याय वापरतात. त्यामुळे सौर ऊर्जेचा प्रवाह कुंपणावर सोडणे हा उत्तम पर्याय आहे. सातपुडा फाउंडेशनसारख्या काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वनखात्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात सौर कुंपणाचा पर्याय बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर राबवण्यात आला आहे. मात्र, ज्या दोन जिल्हय़ात ही समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्या ठिकाणी अजूनही वनखात्याकडून सौर कुंपणाची प्रभावी अंमलबजावणी नाही. चंद्रपूर जिल्हय़ात तत्कालीन उपवनसंरक्षक कल्याणकुमार यांच्या कार्यकाळात हा पर्याय मोठय़ा प्रमाणावर लोकसहभागातून हाती घेतला गेला, पण आता ही प्रक्रिया थंडावली आहे.
सौर कुंपणाचा पर्याय
तृणभक्षी प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान वाचवण्यासाठी आणि पर्यायाने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ‘सामुदायिक सौर कुंपण’ हा पर्याय आहे. या प्रयोगाची सुरुवात चंद्रपूर वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक कल्याणकुमार यांनी २०१२-१३ मध्ये केली होती. वरोरा तालुक्यातील रामपूर गावात संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पहिला प्रयोग राबवला. गावातील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी विश्वासात घेतले. त्यांचा समूह तयार केला. शेती आणि जंगलाच्या सीमेवर दोन ते तीन किलोमीटर सौर कुंपण तयार केले. तीन किलोमीटरसाठी अवघ्या पाच लाख रुपयात सौर कुंपण करण्यात आले. परिणामी त्या गावातील सुमारे २०० शेतकऱ्यांचे शेतपीक वाचले.
वर्षभरात दहा वाघांचे बळी
मध्य भारतात या संपूर्ण एक वर्षांत वीजप्रवाहामुळे दहा वाघ आणि तीन बिबटय़ांना जीव गमवावा लागला. २२ ऑक्टोबर २०१६ ते १४ ऑक्टोबर २०१७ या काळात सहा वाघ महाराष्ट्रात तर चार वाघ मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. तीन बिबटे मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. विदर्भातील मध्य चांदामधील धानापूर परिसरात ४ नोव्हेंबर २०१६ ला एक वाघ वीजप्रवाहाने मृत्युमुखी पडला. तर या वर्षांच्या सुरुवातीला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सालेघाटजवळ एक वाघीण वीजप्रवाहाने मृत्युमुखी पडली. जगप्रसिद्ध जय या वाघाच्या मृत्यूवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले नसले तरीही त्याचाही मृत्यू वीजप्रवाहाने झाल्याची दाट शक्यता आहे. तर जयपासून झालेला श्रीनिवास हा वाघसुद्धा १९ एप्रिल २०१७ ला नागभिडजवळील कोथुळना येथील शेतात वीजप्रवाहाने मारला गेला.