वर्धा : विविध पतसंस्था, पेढ्या, सहकारी पतसंस्था याद्वारे फसवणूक होण्याच्या घटना नव्या नाहीत. सामान्य नागरिक मोठ्या विश्वासाने या आर्थिक उलाढाल करणाऱ्या संस्थात आपली पुंजी लवकर दुप्पट होण्याच्या आशेने ठेवतात. पण मग आर्थिक घोटाळा होतो आणि आयुष्यभराची पुंजी मातीमोल होऊन जाते.वर्ध्यातील हा आर्थिक घोटाळा चांगलाच गाजला होता. शेतकरी महिला निधी लिमिटेड म्हणून पतसंस्था स्थापन झाली होती. शरद अरुण कांबळे व अन्य संचालक मंडळात होते. गुंतवणूकदारास कमी काळात अधिक मोबदला देण्याची हमी देत लोकांना भुरळ पाडण्यात आली. बँक असल्याचे भासवून वर्धा व अमरावती जिल्ह्यात दहा शाखा उघडून दुकान थाटण्यात आले होते.

दोन्ही जिल्ह्यातील २७ हजार २८३ लोकांचे ३८ कोटी ४६ लाख ९५ हजार रुपये गोळा करण्यात आले. दैनिक ठेव, बचत व मुदत ठेव स्वरूपात ही रक्कम गोळा करण्यात आली होती. मात्र काही काळाने फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात येत गेले. आज देतो, उद्या देतो अशी झुलवाझुलवी सूरू झाली. शेवटी पैसे मिळणार नाहीच, असे ग्राहक खातेदारांना स्पष्ट झाले. लोकं संतप्त होत रस्त्यावर उतरले. मोर्चे निघाले. त्यावेळी आमदार असलेले विद्यमान पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. अखेर २५ जून २०२४ रोजी अध्यक्ष शरद कांबळेविरोधात फसवणूक व अन्य कलमखाली गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आरोपीच्या संपत्तीची चौकशी सुरूच होती. ९ महिन्यात १५ कोटी ११ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

वर्धा उपविभागीय अधिकारी यांची या संदर्भात सक्षम प्राधिकर अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली. ८ एप्रिल रोजी तशी अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे पीडित खातेदारांना पुढील काळात त्यांची बुडीत रक्कम परत मिळण्याची खात्री दिल्या जाते.रक्कम परत करण्याची कार्यवाही सूरू झाल्याचे जिल्हा पोलिसांनी आज स्पष्ट केले आहे. अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांच्या हस्ते पीडित देवानंद बारहाते व अन्य खातेदारांना या राजपत्राची प्रत भेट देण्यात आली आहे.

या सर्वत्र गजलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी तपास सूत्रे हलविली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पुंडलिक भटकर, उपनिरीक्षक शांताराम मुदमाळी, विवेक राऊत तसेच गजानन काळे, संतोष जयस्वाल, शैलेश भालशंकर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी फत्ते केली.