बुलढाणा : शासन, प्रशासन, राजकीय पक्ष व समाज या सर्वांच्या उपेक्षेचे बळी ठरलेल्या फासेपारधी समाज बांधवांनी आजपासून येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज व उद्या आयोजित आंदोलनात आंदोलक सपरिवार सहभागी झाले आहे. मुख्य धंदा शिकार बंद, शिक्षण नाही, नोकरी बंद, विश्वास नाही रोजगार बंद, जागा नाही घरकुल बंद, सवलत आहे लाभ बंद, आंदोलन केले जमावबंद, अशी फासेपारधी बांधवांची विचित्र स्थिती आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षातही हे दुर्दैवी चित्र कायम असल्याचे दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनांचे अध्यक्ष युवराज पवार यांनी आंदोलन स्थळी लोकसत्तासोबत बोलतांना सांगितले. याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारपासून दोन दिवसीय फासेपारधी धरणे बिऱ्हाड आंदोलन करण्यात येत असल्याचे अ.भा. आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष नंदिनी टारपे यांनी सांगितले. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष रत्ना पवार, मूलनिवासी मोर्चाचे प्रशांत सोनोने, दिपू पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यात आबालवृद्ध समाज बांधव सहभागी झाले आहे.
हेही वाचा – अमरावती : पुणेकर जावयाने सासऱ्याला दीड कोटींनी गंडविले
अनुसूचित जमाती पडताळणी कार्यालय बुलढाण्यात कार्यान्वित करावे, बुलढाण्यात आदिवासी प्रकल्प विकास कार्यालय स्थापन करावे, स्वतंत्र विकास महामंडळ गठीत करावे, बचत गटांना दहा लाखांचे अनुदान, स्वाभिमानी योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.