नागपूर : महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने शनिवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये वृत्तपत्रापासून तयार केलेली पोशाख परिधान करुन ‘रॅम्प वॉक’ करणारे तरुण-तरुणींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशन आयईसी चमूद्वारे पुढाकार घेऊन जुन्या वर्तमानपत्रांपासून सुंदर पोशाख तयार केले. पर्यावरण संरक्षण आणि सर्जनशीलतेचे हे उत्तम उदाहरण ठरलेले हे सुंदर पोशाख फॅशन शो मध्ये आकर्षणाचे केंद्र होते. या उपक्रमातून केवळ पुनर्वापर, नवनिर्मिती आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन मिळाले नाही तर महिलांची सर्जनशीलता आणि नवकल्पनाही अधोरेखित झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन शो मध्ये सहभागी झालेल्या महिला व पुरुषाने परिधान केलेल्या कागदी पोशाखासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. टाकाऊ वस्तूंमधून कलात्मकतेचा संदेश देणाऱ्या या रॅम्प वॉकला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गायिका अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, श्रीमती अश्विनी जिचकार, डॉ. अनुश्री चौधरी आदी उपस्थित होते.

जलस्त्रोतांना विळखा देणारी जलपर्णी अनेक सुंदर आणि उपयोगी वस्तूंची निर्मिती करु शकते, याची प्रचिती आली. महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये रेशीमबाग मैदानामध्ये महापालिका, समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये अनेक बचत गट तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांनी आपल्या विभिन्न उत्पादनांचे स्टॉल्स लावले होते.रेशीमबाग मैदानातील २५० स्टॉल्समध्ये अनेक स्टॉल्समध्ये अनोखे उत्पादने भुरळ घालतात. चंद्रपूर येथील अजय संस्थेद्वारे जलपर्णीपासून निर्माण केलेली उत्पादने ही कुतूहलाचा विषय ठरली आहेत. तलावातील पाण्यावर आपले साम्राज्य पसवून विळखा देणारी जलपर्णी पर्यावरण प्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. या जलपर्णीपासून सुंदर बहुउपयोगी वस्तू तयार करुन अजय संस्थेने यावर उत्तम उपाय शोधला आहे.जलपर्णीपासून लॅपटॉब बॅग, फाईल फोल्डर, बास्केट, योगा मॅट, डायनिंग व डिनर मॅट, कस्टमाइज गिफ्ट अशा अनेक वस्तूंची निर्मिती संस्थेद्वारे करण्यात आली आहे. या वस्तू महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध देखील आहे.

५० रुपये ते २ हजार रुपयांपर्यंतची ज्वेलरी

महिला उद्योजिका मेळाव्यात महिलांचे सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, बॅग, पर्स अशा वस्तूंच्या स्टॉल्सची चांगलीच रेचलेच आहे. अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अहमदाबाद ज्वेलरी, राजस्थानी ज्वेलरी अशी अनेक ज्वेलरी उत्पादने अगदी ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत रेशीमबाग मैदानात उपलब्ध आहेत. यासोबतच मुलतानी माती, रिठा, शिकाकाई असे नैसर्गिक सौंदर्य उत्पादने देखील येथे आहेत.