लोकसत्ता टीम
बुलढाणा : राज्य शासन आणि आरोग्य यंत्रणांच्या कडक निर्बंधांनंतरही अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदानाचा बेकायदेशीर व्यवसाय जोरात सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आज मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत छुप्या मार्गाने सुरू असलेल्या या ‘गोरखधंद्या’वर शिक्कामोर्तब झाले.
आज शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये दोन जिल्ह्यातील दोघा इसमाना ताब्यात घेण्यात आले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती. काटेकोर गुप्ततेत करण्यात आलेल्या या कारवाईचा विस्तृत तपशील येथे मिळाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मेहकर शहरातील पवनसुत नगर मधील एका व्यापार संकुलात ही कारवाई करण्यात आली आहे. मेहकर मधील पवनसुत नगरमध्ये वैशाली संदीप मुठाड यांच्या जागेत भाडे करार तत्ववार अवैध सोनाग्राफी केंद्र सुरू असल्याची माहिती आरोग्य सेवा यंत्रणांना मिळाली होती.
एक आरोपी वाशीमचा
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णलायाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आपल्या पथकासह मेहकरमध्ये दाखल झाले. नियोजनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे विशेष पोलीस पथक व मेहकर पोलीस ठाण्याच्या पथकाने सोनोग्राफी केंद्रावर छापा टाकला. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत किसन हरिभाऊ गरड (रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशीम) आणि गणेश शिवाजी सुलताने (रा. गुंजखेड, ता. लोणार, जि. बुलढाणा) या दोघांना संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. कथित सोनोग्राफी केंद्रातील साहित्य, उपकरणे, संयत्रांची तपासणी करण्यात आल्यावर सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले.
वृत्त लिहिपर्यत गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणी गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आरोग्य सेवेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
भादोल्यात चाकू हल्ला
किरकोळ कारणावरून एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना बुलढाणा खामगाव मार्गावरील भादोला येथे घडली. यामुळे भादोला गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. लहान मुलांचे भांडण सोडवले म्हणून दोन युवकात प्रारंभी वाद झाला. या वादाचे पर्यवसान चाकू हल्यात झाले. भादोला येथील रहिवासी शेख सात शेख जुबेर याच्यावर आरोपी सुमित समाधान अंभोरे यांनी चाकूने हल्ला केला. त्यात जुबेर गंभीर जखमी झाला. याप्रकरणी फिर्यादी शेख शाहिद शेख कौसर यांनी आज शनिवारी ,३ ऑगस्ट रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यावरून आरोपी सुमित अंभोरेविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd