लोकसत्ता टीम
नागपूर : जीवनात एकापाठोपाठ एक अडचणी आल्या की हे नशिबाचे भोग असे म्हंटले जाते, धनसंपत्ती प्राप्त झाली तर नशीब फळफळले असे मानले जाते. मात्र मानवी जीवनातच नशिबाला महत्व आहे असे नव्हे, एखाद्या रस्त्याच्या वाट्यालाही नशिबाचे भोग आणि नशिब फळफळने वाट्याला येते. महत्व असते या रस्त्यांवरून जाणारे कोण याचे. सर्वसामान्य असेल तर रस्ता कसाही असला तरी चालते पण जर जाणारा व्हीव्हीआयपी असेल तर मात्र तो गळुगळीतच असायला हवा आणि नसेल तर तो तसा करायलाच हवा. नागपुरातील काही रस्त्यांच्या वाट्याला नशिबाचे भोग आले तर काहींचे भाग्य फळफळल्याचे दिसून येते.
अंबाझरी तलावाच्या समोरून जाणारा पक्का रस्ता बंद केल्यावर पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली. सहाजिकच या रस्त्यांवरचा वाहतुकीचा भार वाढला आणि त्यांची अवस्था दयनीय झाली. यापैकीच एक रस्ता श्रद्धानंद पेठ ते गांधीनगर चौक या दरम्यानचा. चालत जायचे म्हंटले तर अश्यक्य होईल, अशी अवस्था या रस्त्याची होती. दुचाकी वाहनावरून जायचे म्हंटले तर कधी घसरून पडाल हे सांगताच येत नव्हते. चारचाकी वाहनांनी गेले तरी इतके झटके बसत की पुन्हा या रस्त्यावरून जाण्याची हिंम्मत होणार नाही, लोकांनी नाराजी व्यक्त केली, संताप व्यक्त केला. पण प्रशासन काही हलले नाही. थातुरूमाथूर दुरुस्ती केली पण अजूनही या रस्त्याचे नशिबाचे भोग काही संपलेले नाही.
आणखी वाचा-नागपूर : प्रेयसीची चित्रफित इंस्टाग्रामवर, प्रियकराची रवानगी कारागृहात
असाच दुसरा रस्ता त्रिमूर्तीनगरमधील. अर्धवट सिमेंटचा, तो पूर्ण करावा म्हणून नागरिकांनी कंत्राटदाराला विणवणी केली. पण लोकांची विनंती मान्य करेल तो कंत्राटदार कसला. याच रस्त्यालगत असलेल्या मंदिरातील भाविकांना याची अडचण झाली, त्यांनी त्रागा व्यक्त केला. धार्मिक बाब म्हंटल्यावर त्याची दखल घेतली जाणारच, तशी घेतलीही गेली. बड्या नेत्याने रस्त्याला भेट दिली आणि अनेक वर्षापासून थांबलेले काम काही क्षणात सुरू झाले. याला म्हणतात भाग्य फळफळणे. रस्ताच तो. बोलू शकणारच नाही, त्र्यागाही व्यक्त करू शकणार नाही, पण रस्त्याचे भाग्य नेत्यांच्या भेटीने फळफळले हे सांगणारे अनेक आहेत. खड्डे भरलेल्या रस्त्यांवरून जाणाऱ्यांना आता त्यांच्या रस्त्याचा भाग्योदय करणारा नेता हवा आहे.
आणखी वाचा-आधुनिक युगातील एकलव्य, इकोइंग ग्रीन फेलोशिपचा मानकरी
शहरातील सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्रिमूर्तीनगर चौकातून गजानन मंदिरासमोरून लंडन स्ट्रीटपर्यंत जाणाऱ्या अर्धवट सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षच आंदोलन करतो म्हटल्यावर त्याची दखल घेतली गेली.पाहणी केली. याठिकाणी काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी, कंत्राटदारांना देण्यात आले. त्यानंतर वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली.
© The Indian Express (P) Ltd