पोट दुखते म्हणून आईने अल्पवयीन मुलीला दवाखान्यात आणले. तपासणीनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळले. धक्कादायक बाब म्हणजे वासनांध जन्मदात्या पित्यानेच तिच्यावर सतत अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.समाजमनाला सुन्न करणारी ही घृणास्पद घटना चिखली तालुक्यात घडली असून पवित्र नात्याला काळिमा लावणाऱ्या नराधम पित्यास चिखली पोलिसांनी गजाआड केले आहे. चिखली नजीकच्या एका गावातील पीडित १६ वर्षीय मुलीचे पोट दुखत असल्याने आईने चिखलीतील एका खासगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा
मात्र, मुलगी व आई या दोघींनीही काहीही सांगण्यास नकार दिला. मला फक्त माझ्या मुलीचा उपचार करायचा आहे, आमचे घरचे प्रकरण आहे आम्ही घरातच मिटवणार आहोत, असे पीडितेच्या आईने सांगितले. मात्र, डॉक्टरांनी कायद्याचे पालन करीत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघींची चौकशी केली असता दोघींनीही तक्रार देण्यात नकार दिला. यामुळे चक्रावून गेलेल्या पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होत आरोपी पित्याविरुद्ध कलम ३७६ व पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला. पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.