अकोला : एका १० वर्षीय मुलीवर नात्यातील नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी २३ ऑगस्टला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून घडत होता. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करणार आहे.
तेल्हारा तालुक्यातील तक्रारदार कुटुंब शहरातील वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यासोबत १० वर्षांची पीडित मुलगी देखील आली होती. ते अकोला तालुक्यातील तामसवाडी गावात देखील गेले होते. या गावात नराधम तरुणाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यासंदर्भात कुणालाही सांगितल्यास आरोपीने पीडितेला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, आई-वडील काम आटोपून घरी परतल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. याअगोदर साधारणत: एक वर्षापूर्वी तक्रारदार यांच्या तेल्हारा तालुक्यातील गावात देखील आरोपी तरुणाने पीडितेवर अत्याचार केला होता. मुलीसह पालकांनी तातडीने अकोट फैल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेची जबानी घेऊन तात्काळ अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेऊन त्याला वल्लभनगर येथून अटक केली. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर टोल घेता, पण सुविधा देत नाही… उच्च न्यायालय म्हणाले…
दरम्यान, तपासात आणखी एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेची जबानी नोंदवली. त्यामध्ये पीडितेने आपला जन्मदाता बापच अत्याचार करीत असल्याचे सांगितले. वडील पोटच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करीत होता. दारूच्या नशेमध्ये घरात कोणी नसल्याचे पाहून वडिलाने अनेक वेळा अत्याचार केल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन नराधम वडिलाविरोधात बीएनएस कलम ६४, ६४ (२), (एफ), (एम), ६५, (२), ३३३, ३५१ (२) (३) तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एल)(एम)(एन), ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd