गोंदिया : वडील मद्यधुंद अवस्थेत घरी यायचे.आई सोबत नेहमीच वाद घालायचे. आईच्या चारित्र्यावर संशय… अश्लील शिवीगाळ ही नित्याची बाब सहन न झाल्याने मुलाने आपल्या वडिलांना याकरिता हटकले असता वडिलाने मुलाच्या पोटात चाकू भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यात घडली. मद्यप्राशन करून पत्नीच्या मागे नेहमीच कटकट करायचा. ही बाब नित्याचीच झाली होती. परंतु ११ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता मद्यप्राशन करून आलेल्या बाळकृष्ण काशिराम कावळे (५०, रा. कोकणा जमी, ता. सडक-अर्जुनी) याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासह वाद घातला.
बराच वेळ हा वाद ऐकत असलेल्या मुलाने अखेर सहन न झाल्याने बाबा.. आई सोबत वाद का घालता असे मुलाने हटकले. त्यामुळे संतापून वडिलाने मुलाला चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शुभम बाळकृष्ण कावळे (२४, रा. कोकणा जमी) असे जखमीचे नाव आहे. बापलेकांचा वाद होत असल्याचे पाहून शुभमची आई त्याला घरातून बाहेर घेऊन आली. मात्र त्यापूर्वी मद्याच्या धुंदीत असलेल्या बाळकृष्ण याने आपल्या मुलाला उद्देशून आता.. तुला मी जिवंत सोडणार नाही, असे म्हणत चाकूने पोटात भोसकून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा मदतीला जवळील शेजारी आणि नातेवाईक धावले त्यांनी त्याचा प्रथमोपचार सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटने संदर्भात शनिवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी डुग्गीपार पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण कावळे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मुलाच्या पोटात चाकूने भोसकून घरातून फरार झालेल्या बाळकृष्ण काशिराम कावळे (५०, रा. कोकणा/जमी. ता. सडक अर्जुनी याला डुग्गीपार पोलिसांनी १२ एप्रिल रोजी सायंकाळी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश सरोदे करीत आहेत.
आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी…
आरोपी बाळकृष्ण काशिराम कावळे (५०) रा. कोकणा/जमी. याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती डुग्गीपार ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली.