चंद्रपूर : शेजारच्या शेतात वाटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी का गेले? असा जाब विचारत मुलाने जन्मदात्या वडिलांना जबर मारहाण केली. त्यानंतर वडील कसेबसे घरी पोहोचले. मात्र, राग अनावर झालेल्या मुलाने घरी येऊन पुन्हा वडिलांना लोखंडी शस्त्र व काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन व मेंडकी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या बरडकिन्ही गावात घडली. नामदेव लक्ष्मण गडे (६५), असे मृताचे, तर होमराज गडे (३२), असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

ब्रह्मपुरी तालुक्यातील बगडकिन्ही येथील नामदेव गडे हे निळकंठ पाकडे यांच्या शेतात वाटाण्याच्या शेंगा तोडायला गेले होते. ही बाब नामदेव यांचा मुलगा होमराज याला माहिती पडली. यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने या क्षुल्लक कारणावरून वडिलांना शेतातच जबर मारहाण केली. या मारहाणीत वडील अर्धमेले झाले होते. त्यानंतर ते कसेबसे घरी पोहचले. मुलाने पुन्हा घरातील लोखंडी शस्त्र व काठीने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने रक्ताने माखलेले कपडे व काठी चुलीत जाळण्याचा प्रयत्न केला.

…अन् असे फुटले बिंग

त्यानंतर मुलाने गावातील पोलीस पाटलांकडे धाव घेतली. माझे वडील मरण पावले, असे त्याने पोलीस पाटलांना सांगितले. पोलीस पाटलांनी घटनास्थळाची पाहणी. रक्त व इतर परिस्थिती पाहून संशय आल्याने त्यांनी घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना दिली. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांनबले लगेचच पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आला. मुलाची चौकशी केली असता त्यानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी होमराज गडे याला अटक केली.

Story img Loader