यवतमाळ : मृत्यू कोणाला कसा गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना कळंब तालुक्यात घडली. वानरांच्या झाडावरील मर्कटलीला एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतल्या. कळंब ते खुटाळा मार्गाने दुचाकीने जात असताना धावत्या दुचाकीवर वानराने उडी घेतली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कोसळून बाप- लेक गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलावर उपचार सुरू आहे.
रणजित यादव (४५, रा. सोनेगाव) असे मृताचे नाव आहे. मुलगा ललित यादव (१६) हा जखमी आहे. रणजित यादव व मुलगा ललितसह कळंबवरून खुटाळा मार्ग सोनेगावकडे जात होते. मार्गात त्यांच्या मोटरसायकलवर वानराने उडी घेतली. अपघातात गंभीर जखमी रणजित यादव यांना सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.