अमरावती : जन्मदात्या वडिलानेच आपल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपातही करण्यात आला. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पीडित १६ वर्षीय मुलगी ही आपल्या एका मैत्रिणीसह २ ऑक्टोबर रोजी घरून निघून गेली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी ती हरविल्याची तक्रार तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला ठाण्यात आणले. त्यानंतर तिचे बयाण नोंदविण्यात आले.
हे ही वाचा…गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
तिच्या बयाणावरून अत्याचाराची ही संतापजनक घटना समोर आली. वडिलांनीच आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भधारणा झाल्यावर घरीच गोळ्या देऊन आपला गर्भपात करण्यात आला. आपल्याला मारहाण करण्यात आली, असे तिने बयाणात सांगितले. तिच्या बयाणावरून पोलिसांनी आरोपी वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
अन्य एका घटनेत लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यातून तीनदा गर्भधारणा झाल्यावर त्यांचा गर्भपातही करण्यात आला. ही घटना नांदगाव खंडेश्वर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अंकीत अशोक सोनगडे (३२) रा. नांदगाव खंडेश्वर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित २७ वर्षीय महिला ही पतीसोबत पटत नसल्याने माहेरी राहायला आली. या काळात अंकीतने त्यांना प्रेमजाळ्यात फासले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पीडित महिलेला तीनदा गर्भधारणा झाली. त्यावर अंकीतने त्यांना तीनही वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर त्याने त्यांना लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने नांदगाव खंडेश्वर ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अंकीतविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्ह्याचे घटनास्थळ हे अमरावती शहरातील राजापेठ ठाणे आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा हा राजापेठ ठाण्यात वर्ग करण्यात आला. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.