नागपूर : पंढरी हत्तीमारे यांना मोठा मुलगा तुषार आणि मोहित अशी दोन मुले आहेत. हे दोघेही सेंट्रीगचे काम करतात. तर मोहित हा काहीच कामधंदा करीत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन आई वडिलांना त्रास द्यायचा. मोहितची आई कॅटरींगचे काम करते. १७ ऑक्टोबरच्या रात्री वडिल पंढरी, मुलगा तुषार आणि मोहित तिघेही घरी होते. रात्री आठ वाजता पंढरी घरात बसले असताना मोहितने दारू पिण्यासाठी पैसे  मागितले. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहितने वडिलांना शिवीगाळ केली. रागाच्या भरात वडिलांनी लाकडी दांड्याने मोहितच्या डोक्यावर फटके मारले. रक्तबंबाळ होत मोहित जमिनीवर कोसळला आणि काही वेळातच त्याची हालचाल थांबली. मोहितला रक्तबंबाळ पाहून वडिल घाबरले. त्याने मुलगा तुषारच्या मदतीने घरातील रक्ताचा सडा पुसून काढला. संपूर्ण घर पाण्याने धुतले.

हेही वाचा >>> दिल्ली-मुंबईच्या मॉडेल तरुणी; नागपूरचे ओयो हॉटेल अन् देहव्यापार…

मोहितचे पार्थिव घरात ठेवून वडिल आणि झोपी गेले. दरम्यान मोहितची आई मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास कॅटरींगच्या कामावरून घरी परतली असता तिला धक्काच बसला. मात्र, मोहितने अतिदारू प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे वडिलांनी सांगितले. पार्थिवासोबत त्यांनी रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी नातेवाईक, परिचित आणि जवळपासच्या लोकांना मोहितच्या मृत्यूची बातमी दिली. दारू पिऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सर्वांना सांगितले. घाईगडबडीत दुपारी १२ वाजेपर्यंत त्याच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कारही करण्यात आले.

हेही वाचा >>> चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक ठार

दारु पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या मुलाच्या डोक्यात लाकूड मारुन वडिलाने खून केला. अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याचा देखावा केला. दुसऱ्या दिवशी घाईत मुलाच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कारही केला. माहिती मिळताच पोलिसांनी धडक दिली. चौकशीत लाकूड डोक्यात घालून मुलाचा खून केल्याची कबुली वडिलांनी दिली. मोहित हत्तीमारे (२२) रा. समतानगर, वाठोडा असे मृत युवकाचे नाव आहे.  प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिल पंढरी हत्तीमारे (५५) आणि त्यांचा मोठा मुलगा तुषार (२४) यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली.

चार तासातच अस्थी विसर्जनाची तयारी

अन्त्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जन केले जाते. मात्र, मोहितच्या वडिलांनी चार तासानंतर म्हणजे सायंकाळी ४ वाजताच अस्थी गोळा केली. तसेच अस्थी विसर्जन करण्याच्या तयारी केली. हे सर्व घाईगडबडीत होत असल्याने एका खबऱ्याने संशयास्पद मृत्यू असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी वडिल अस्थी विसर्जनाच्या तयारीत असताना पोलीस धडकले. त्यांनी आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी पंढरी आणि त्याचा मुलगा तुषारला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father killed son for demanding money to drink liquor adk 83 zws