वर्धा : भारताच्या त्रिकोणमितीय नकाशाचे जनक कर्नल विल्यम लेंम्बटन यांच्या दोनशेव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे जनक म्हणून इतिहासात नोंद झालेल्या कर्नल विल्यम यांचे हिंगणघाट शहरात तब्बल तेरा वर्षे वास्तव्य होते. येथेच त्यांचा २० जानेवारी १९२३ ला मृत्यू झाला होता.
टिपू सुलतान सोबत लढताना दिशा व लढाईतील महत्त्वाच्या स्थळांचे सर्वेक्षणाचे काम इंग्रजांनी त्यांच्यावर सोपवले होते. भारतीय उपखंडाचा नकाशा व ‘मेरेडिअन आर्क’ मोजण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा परिघ मोजला होता. त्याबद्दल फ्रेंच सायन्स अकादमी व ब्रिटिश रॉयल सोसायटीने त्यांना सन्मानित केले होते. भारताचा नकाशा तयार करण्याचे कार्य १८०२ साली मद्रास येथून सुरू झाले. ही मोहीम हिंगणघाट येथे आली असताना विल्यम यांचे वास्तव्य येथे होते. येथेच त्यांचे समाधीस्थळ बांधण्यात आले. तसेच ‘स्टँडर्ड बेंच मार्क स्टोन’ लावण्यात आला आहे.
हेही वाचा >>> गोंडवाना विद्यापीठात ओबीसींसाठी ९ पदे राखीव
हे स्थळ केरकचऱ्यात घाणेरड्या अवस्थेत दिसून आल्यानंतर स्थानिक निसर्गप्रेमींनी त्या ठिकाणी सफाई केली. त्यांच्या कार्यावर प्रा. प्रवीण कडू यांनी पुस्तक लिहून इतिहास जगापुढे आणला. आज सायकल रॅली द्वारे जनजागरण करीत स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम होत आहे. कर्नल विल्यम यांची द्विशताब्दी साजरी करण्याचे ठरले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवरांना निमंत्रित केले जाणार असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.